समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सनी बूस्टरकडे पाठ फिरवली आहे. या तीन गटातील ५ लाख ८९ हजार ७०५ जणांपैकी केवळ १ लाख ८१ हजार २५७ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. जुलै महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त हाेत असताना बूस्टर डोस घेण्याकडे केलेले हे दुर्लक्ष महागात पडू शकते.
१६ जानेवारी २०२१पासून कोरोनाविरोधी लसीकरण संपूर्ण देशभर सुरू झाले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, नंतर ६० वर्षांवरील, नंतर १८ वर्षांवरील त्यानंतर १२ वर्षांवरील अशा पध्दतीने अधिकाधिक लोकसंख्या लसीकरणाखाली आणली गेली. दरम्यान, केंद्र सरकारने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि हेल्थ, फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी बूस्टर डोसची योजना आणली. परंतु कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात बूस्टर डोस घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे.
दोन लाख नागरिकांनी एकही डोस घेतला नाहीजिल्ह्यात एकूण ३३ लाख ४३ हजार ४९० इतक्या पात्र नागरिक, मुलांना डोस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी तब्बल २ लाख ६ हजार ७१७ जणांनी एकही डोस घेतलेला नाही. यातील काही जणांनी अन्य जिल्ह्यात, आयडी बदलून डोस घेतल्याचे सांगण्यात येते. परंतु तरीही यातील अनेकांनी एकही डोस घेतलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
सहा लाख ८४ हजार नागरिकांची दुसऱ्या डोसकडे पाठ
ज्या ३१ लाख ३६ हजार ७७३ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी तरी दुसरा डोस वेळेत घेण्याची गरज होती. परंतु तिथेही दुर्लक्ष झाले असून, तब्बल ६ लाख ८४ हजार ७१९ जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
१ लाख ८१ हजार जणांनीच घेतला बूस्टरकेंद्र शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, हेल्थ आणि फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी बूस्टर डोस देण्याची योजना आणली. यासाठी ५ लाख ८९ हजार ७०५ जणांनी बूस्टर डोस घेणे अपेक्षित असताना केवळ १ लाख ८१ हजार २५७ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. अजूनही ४ लाख ८ हजार ४४८ जणांनी बूस्टरकडे पाठ फिरवली आहे.
आता ‘हर घर दस्तक’
गतवर्षी १ नोव्हेंबरपासून ज्यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला नव्हता, त्यांच्यासाठी ‘हर घर दस्तक’ उपक्रम सुरू करण्यात आला होता. यामध्ये ज्यांना घराबाहेर पडणे अगदीच शक्य नाही, अशांसाठी घरातही दुसरा डोस दिला जात होता. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आणि शहरात आता गल्लीगल्लीत बूस्टर डोस देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शहरात ५० ठिकाणी लसीकरणकोल्हापूर शहरात महापालिकेची ११ आरोग्य केंद्रे, सीपीआर रुग्णालय आणि कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय या ठिकाणी बूस्टर डोस देण्याची व्यवस्था आहे.
बूस्टर डोसची स्थिती
गट | अपेक्षित | प्रत्यक्षात लसीकरण |
६० वर्षांवरील | ४,४९,००० | ६४,२८१ |
फ्रंट लाईन वर्कर | ९६,३९२ | १०,९२७ |
हेल्थ वर्कर | ४४,३१३ | १२,८०२ |
एकूण | ५,८९,७०५ | १,८१.२५७ |
राज्यातील तीन शहरांमधील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याही जिल्ह्यात दक्षता घेण्याची गरज आहे. परंतु नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, त्यांनी बूस्टर डोस तातडीने घ्यावा. -डॉ. फारूक देसाई, जिल्हा लसीकरण समन्वय अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर