कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील-भुयेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 06:21 PM2021-06-12T18:21:23+5:302021-06-12T18:25:22+5:30
Congress Kolhapur : शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संस्थापक सदस्य, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाबासाहेब ज्ञानदेव पाटील (भुये, ता. करवीर) (वय ७८) यांचे शनिवारी दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संस्थापक सदस्य, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाबासाहेब ज्ञानदेव पाटील (भुये, ता. करवीर) (वय ७८) यांचे शनिवारी दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
रुबाबदार मिश्या, स्पष्टवक्तेपणा आणि सर्व समावेशक नेतृत्व म्हणून बाबासाहेब पाटील यांची जिल्ह्यात ओळख होती. कॉग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांनी करवीरमध्ये राजकीय सुरुवात केली. १९७७ मध्ये त्यांनी शेकापमधून करवीर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर पुन्हा ते कॉग्रेसमध्ये सक्रीय झाले, दिवंगत नेते श्रीपतराव बोंद्रेदादा यांचे ते निष्ठावंत सहकारी होते.
बोंद्रेदादा नंतर आमदार पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ते सक्रीय राहिले. भुये गावातील विविध संस्थांच्या उभारणीत त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी तब्बल तेरा वर्षे करवीरचे सभापती तर दहा वर्षे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले.
त्यांच्यावर गेल्या तीन महिन्यापासून कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसापुर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. शनिवारी दुपारी साडे बारा वाजता ताराबाई पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. कसबा बावडा येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका शंकुतला पाटील, सूपूत्र राजीवजी सूतगिरणीचे संचालक भारत, उत्तम, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी साडे आठ वाजता आहे.