कोल्हापूर - ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि कोल्हापूरच्या सामाजिक जीवनातील कृतिशील व्यक्तिमत्त्व असलेले डी बी पाटील (वय 85) यांचे मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.कोल्हापुरातील बहुजन समाजाची शिक्षण संस्था असलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्था आज उत्तमपद्धतीने काम करत आहेत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचेही त्यांनी अनेक वर्षे अध्यक्षपद सांभाळले. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या गोष्टीना त्यांनी कायमच बळ दिले. राजर्षी शाहू महाराज यांच्यावर दूरदर्शनवर मालिका करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचे त्यांच्यावर संस्कार होते. समाजात जे जे चांगलं घडतंय, घडलं पाहिजे यासाठी ते यथाशक्ती पाठबळ देत राहिला. प्रिन्स शिवाजी बोर्डिंग चा सध्या शतक महोत्सव सुरू असून त्यामध्येही या वयात ते सक्रिय होते.डी. बी. पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावचे असले तरी त्यांची कर्मभूमी कोल्हापूर हीच राहिली. कोल्हापूरातील अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो..त्यामुळे त्याच्याशी चर्चा करून उद्या बुधवारी अंत्यसंस्कार बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांचे पार्थिव डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागरात ठेवण्यात येणार आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 8:14 PM