जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी येथील आदगोंडा देवगोंडा पाटील-सांगवडेकर (वय १०८) यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर शहरातून अंत्ययात्रा काढून उदगांव येथील कृष्णा नदी काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सांगवडे (ता.करवीर) येथे आदगोंडा पाटील यांचा जन्म १ आॅक्टोबर १९१६ रोजी झाला होता. जयसिंगपूर येथे व्यवसाय व नोकरी निमित्त सन १९३९ साली आले. दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याबरोबर आदगोंडा पाटील यांनीही देश लढ्यात सहभाग घेतला होता. देशसेवेत केलेल्या कामाची दखल घेवून सन १९९५ पासून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून पेन्शन मिळत होती.२३ फेब्रुवारी १९८८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेले योगदानामुळे त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले होते. ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून स्वातंत्र्य सैनिक पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि.१२) सकाळी उदगांव वैकुंठधाम येथे होणार आहे.
कोल्हापूर: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदगोंडा पाटील यांचे निधन, १०८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 7:01 PM