कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार, संपादक अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र देण्यात आले. यावेळी तुमच्यामुळे कोल्हापूर भेटले, अशा शब्दात अनंत दीक्षित यांनी प्रतिक्रिया दिली.ज्येष्ठ पत्रकार, संपादक अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबमार्फत मानपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनंत दीक्षित यांची प्रकृती बरी नसते, त्यांना एक दिवसाआड डायलिसिस करावे लागते. ज्या दिवशी डायलिसिस केले जाते, त्याच्या दुसऱ्या दिवशीची वेळ मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
त्यानुसार त्यांनी रविवारची दुपारची वेळ प्रेस क्लबला दिली. त्यांच्या प्रकृतीचा विचार करून काही निवडक प्रतिनिधींनी यावे अशी सूचना त्यांच्या कुटुंबीयांकडून आल्यामुळे रविवारी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, संचालक संदीप आडनाईक, डॅनियल काळे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय पाटोळे यांनी अनंत दीक्षित यांची औंध, पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी कोल्हापूर प्रेस क्लब आणि समस्त कोल्हापूरकर यांच्यामार्फत अध्यक्ष मोहन मेस्त्री यांच्या हस्ते अनंत दीक्षित यांना शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या अर्धांगिनी अंजली दीक्षित यांचाही साडी देऊन सन्मान करण्यात आला. दीक्षित यांनी कोल्हापूरकरांचे आस्थेने आदरातिथ्य केले. संचालक संदीप आडनाईक यांनी मानपत्राचे वाचन केले.प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे स्वागत स्वत: अनंत दीक्षित आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केले. कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर, सद्य:स्थितीतील राजकारणावर, शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत त्यांनी परखड मत मांडले. यावेळी त्यांनी कोल्हापुरातील अनेक मान्यवरांच्या आठवणी सांगत सुमारे दोन तास चर्चा केली. दीक्षित यांनी कोल्हापूर प्रेस क्लबच्या अनेक उपक्रमांबद्दल खूप चांगले उद्गार काढले. प्रेस क्लबने माझी आठवण काढली आणि तुम्ही मला भेटायला आलात, याचेच मला खूप समाधान वाटते, तुम्हाला भेटून कोल्हापूर भेटले असे ते म्हणाले.
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहित आहे. आपण समक्ष पुण्यात माझ्या घरी येऊन मला मानपत्र दिले. आपल्या सर्व सहकाऱ्यांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. पुरस्कार संस्कृतीमध्ये सार्वजनिक जीवनात घसरण सुरू असताना मी कोणत्याही पद्धतीने आपल्याला काहीही सुचविले नसताना माझा गौरव केलात. हे आपले सार्वजनिक शील आहे. आपल्या येण्याने मला कोल्हापूरच भेटले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बºयाच कालावधीनंतर अडीच तास सलग मी बसू शकलो. आपल्यासारख्या प्रतिष्ठित संस्थेने माझा कोल्हापूरशी असणारा ऋृणानुबंध अधिक घट्ट केला.अनंत दीक्षित, पुणे.