विश्वास पाटील
कोल्हापूर : माझ्याबद्दल तुमच्या मनात प्रेम असेल तर मी ज्या विचाराने आयुष्य व्यतित केले, त्यातील काही विचार घेऊन तुम्ही दोन पावले चाला..रक्षाविसर्जन व तत्सम गोष्टींमध्ये अडकू नका..माणूसच गेल्यानंतर राखेत काय ठेवलंय, अशा भावना ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मृत्यूची कुणकुण लागल्यावर व्यक्त केल्या होत्या. तशा अर्थाचे पत्रही त्यांनी चार वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते.
त्यांच्या विचारांना अनुसरूनच प्रा. पाटील यांच्या रक्षेचे शेतात व बागेमध्ये विसर्जन करण्यात आले. रक्षाविसर्जनाचा कोणताही विधी अथवा रक्षा गावोगावी नेऊन ती अंत्यदर्शनासाठी ठेवणे, अशा प्रथांना पायबंद घालण्यात आला.
प्रा.पाटील यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवारी त्यांच्यावर कसबा बावडा परिसरातील स्मशानभूमीत चळवळीतील मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळीही कोणताही विधी अथवा मंत्रोच्चार करण्यात आला नव्हता. प्रा. पाटील यांनी हयातभर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम केले. त्यामुळे निधनानंतर असे कोणतेही कर्मकांड करण्यास त्यांचा सक्त विरोध होता. त्यामुळे रक्षाविसर्जनही पारंपरिक पद्धतीस फाटा देऊनच अत्यंत साधेपणाने करण्यात आले.त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते त्यांची रक्षा गावी नेऊन गावांत अंत्यदर्शनासाठी ठेवतो, असे आग्रह करत होते; परंतु तसे काहीही करण्यास कुटुंबीयांनी विरोध दर्शवला. प्रा. पाटील हे आपल्यात नाहीत. त्यांनी आयुष्यभर ज्या विचारांचे संगोपन केले, त्या विचारांना त्यांच्या निधनानंतरही कोणत्याही कृत्याने बट्टा लागू द्यायचा नाही, या विचारातून रक्षाविसर्जन शेतीत व काही कार्यकर्त्यांनी बागेत घालण्यासाठी म्हणून त्यांची रक्षा नेली.
संस्था चांगल्या चालवा..
प्रा. पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे की, ढवळी ग्रामस्थ व माझ्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनो..माझे विचार तुम्हाला माहीत आहेतच. मी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम करत राहिलो. त्यामुळे रक्षाविसर्जन, दहावा, बारावा या गोष्टी माझ्या मनाला न पटणाऱ्या आहेत. मला आता मृत्यूची चाहूल लागली आहे. त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझे विचार पुढे न्या..तुम्ही ज्या संस्थांत काम करत आहात त्या चांगल्या चालवा. भ्रष्टाचाराला थारा देऊ नका. गावाला वंदनीय होईल, असे काम करून दाखवा.