लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर/बेळगाव : गुन्हेगार जमातीचा शिक्का मारलेल्या बेरड (बेरड-नाईक) समाजाच्या सुधारणांसाठी गेली ४५ वर्षे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि साहित्यिक ‘बेरड’कार डॉ. भीमराव गस्ती (वय ७०) यांचे मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बेळगावजवळील यमनापूर या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.डॉ. गस्ती यांनी देवदासीची कुप्रथा बंद व्हावी यासाठी आयुष्य वेचले. त्यांनी सामाजिक कार्याबरोबरच विपुल लेखनसुद्धा केले आहे. बेरड समाजाच्या व्यथा-वेदना मांडणाºया ‘बेरड’ या त्यांच्या आत्मचरित्राने साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.डॉ. गस्ती गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचा मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगितले. ३ आॅगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची स्वाईन फ्लूची चाचणी करण्यात आली होती. शनिवारी त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली नसल्याचा अहवाल मिळाला होता. त्यांना जंतुसंसर्ग झाला होता; शिवाय त्यांच्या दोन्ही किडन्या काम करीत नव्हत्या. त्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण अधिक होते; तसेच कमी रक्तदाबामुळे ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते, असे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले आहे. अखेर मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन बहिणी, सुना, नातवंडे, काका, आत्या असा मोठा परिवार आहे.पालिकेत वाहिली श्रद्धांजलीबेळगाव महापालिकेतर्फे डॉ. गस्ती यांना आदरांजली वाहण्यात आली. महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, आमदार संभाजी पाटील, पालिका आयुक्त शशिधर कुरेर, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्यासह नगरसेवकांनी पालिकेत मौन पाळून डॉ. गस्ती यांना श्रद्धांजली वाहिली.यमनापूर येथे अंत्यसंस्कारमंगळवारी सकाळी १० वाजता गस्ती यांचे पार्थिव यमनापूर येथे आणण्यात आले. यावेळी भटक्या विमुक्त चळवळीतील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अच्युत माने, प्रा. विठ्ठल बन्ने, माहिती व जनसंपर्क खात्याचे उपसंचालक सतीश लळीत, मधूसुदन व्हटकर (सोलापूर), प्रा. शिवानंद गस्ती, आनंदराव जाधव (सातारा), प्रा. सुनील माने, कल्लापा जंगली, गडहिंग्लजचे बाळेश बंधुनाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी यमनापूर येथे गस्ती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक गस्ती यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 1:05 AM