ऑनलाईन लोकमतकोल्हापूर: गडहिंग्लज येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व देवदासी चळवळीतील बिनीचे शिलेदार गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष प्रा.विठ्ठल बन्ने (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगराध्यक्षा अनुपमा, मुलगा सिद्धार्थ, मुलगी स्नेहल, सून व नातवंडे असा परिवार आहे.प्रा.बन्ने हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज रविवारी (१८) सकाळी गडहिंग्लज येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांचा राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी परिवाराशी त्यांचा संबंध आला.सुरुवातीला काही काळ त्यांनी गोव्यात आणि त्यानंतर गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले.दरम्यान, देवदासी, कोल्हाटी-डोंबारी,धनगर समाजासह उपेक्षित आणि वंचितांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी हयातभर संघर्ष केला.राष्ट्र सेवा दल,छात्रभारती,अंधश्रद्धा निर्मूलन आदींसह विविध सामाजिक चळवळीत ते अखेर पर्यंत सक्रिय होते. सुरुवातीला काही वर्षे त्यांनी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासोबत जनता पक्ष,जनता दल आणि त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादीत काम केले.गडहिंग्लजमधून सुरु झालेल्या चळवळीमुळे देवदासी प्रथा निर्मूलन व पुर्नवसनासाठी महाराष्ट्र सरकारने अभ्यासगट नेमला होता. त्याचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. चळवळीमुळे देवदासी प्रथा बंद झाली, परंतु कायदा होऊनही देवदासींचे पुर्नवसन होत नसल्याने ते व्यथित होते.गडहिंग्लज येथे देवदासी मुलांचे वसतिगृह सुरु करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. येथील साधना शिक्षण संस्था व भैरव शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून ते काम पहात होते.
गडहिंग्लज येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बन्ने यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 9:38 AM