कोल्हापूर: ज्येष्ठ नागरीकांनी कोवीड लस रांगा लावून बुधवारी टोचून घेतली. शहरासह जिल्ह्यातील १२० सरकारी केंद्रावर गर्दीचे चित्र दिवसभर होते. यामुळे कोवीड लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यात अनुत्साह अनुभवणाऱ्या लसीकरण यंत्रणेची तिसऱ्या टप्प्यात मात्र पहिल्याच दिवसापासून मरगळ झटकली गेली आहे. चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आरोग्य यंत्रणाही वेगाने कामाला लागली आहे.६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरीक आणि ४५ ते ६० या वगोगटातील व्याधीग्रस्त हा तिसरा टप्पा निश्चित करुन सोमवारपासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सुचना दिल्यानंतर बुधवारपासून या लसीकरण मोहीमेने अधिक गती घेतली आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाने १२० केंद्रे निश्चित करुन लसीकरण व प्रबोधन या पातळीवर एकाचवेळी काम सुरु केले आहे. गावोगावी आशा कर्मचाऱ्यांच्या मार्फत प्रबोधन करण्याबरोबरच ज्येष्ठांना केंद्रात घेऊन येण्यासाठीची यंत्रणाही आरोग्य विभागाने लावली आहे. नोंदणीसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्यात आली असून तेथे नोंदणी होईल, त्याप्रमाणे लस टोचून घेण्यासाठी बोलावले जात आहे.स्वत:च नोंदणी करुन घेत व्याधीग्रस्त व ज्येष्ठ नागरीक लसीकरण केंद्रावर रांगा लावून लस टोचून घेताना दिसत आहेत. सरकारी दवाखान्यात मोफत तर खासगी दवाखान्यात २५० रुपये घेऊन ही लस टोचली जात आहे. मोफत असल्याने सरकारी केंद्राबाहेर गर्दी दिसत आहे.
लस घेतलेल्यांना पुन्हा २८ दिवसांनी दुसरी लस दिली जाणार असल्याने पूर्ण नाव पत्ता, मोबाईल नंबरसह सर्व माहिती रजिस्टरमध्ये भरुन घेतली जात होती. केंद्रावर एकाच वेळी गर्दी झाल्याने किमान अर्धा ते तासभर प्रतिक्षा करत बसावे लागत होते. केंद्रावर मास्क, सॅनिटायझरची दक्षता घेतली जात होती. तसेच लसीकरण झाल्यानंतर अर्धा तास बेडवर विश्रांतीचीही सोय करण्यात आली होती.