कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आघाडी धर्म पाळा, असे आदेश शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने शनिवारी रात्री पक्षाच्या मतदारांना दिले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचा पाठिंबा कुणाला? हा उत्कंठेचा विषय अखेर संपला. यामुळे पक्षाचा पाठिंबा हा अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कॉँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील, तर अपक्ष म्हणून आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. निवडणूक इतकी चुरशीची झाली आहे की? एकेका मताला महत्त्व आले आहे. शिवसेनेची मतेही ३५हून अधिक असल्याने सर्वांच्या नजरा याकडे वळल्या आहेत. त्यादृष्टीने दोन्ही उमेदवारांनी थेट ‘मातोश्री’वरून पाठिंबा मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी सतेज पाटील यांच्यासाठी, तर आमदार महादेवराव महाडिक यांच्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी शेवटपर्यंत ‘मातोश्री’शी संपर्क सुरू ठेवला होता. शुक्रवारी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर कोल्हापुरात दाखल झाल्याने पाठिंब्याचा निर्णय होईल, अशी शक्यता होती; परंतु रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. ‘मातोश्री’वरून आज, शनिवारी सकाळी दहा वाजता पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले; परंतु शनिवारी दिवसभरात निर्णय होऊ शकला नाही. अखेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईहून पक्षनेतृत्वाकडून संपर्कप्रमुख दुधवडकर यांना निरोप आला. त्यामध्ये पक्षाच्या मतदारांनी आघाडी धर्म पाळावा, असे सांगण्यात आले. त्यानुसार संपर्कप्रमुखांनी सर्व मतदार, पदाधिकारी व नेत्यांशी संपर्क साधून याबाबत सूचना केल्या. त्यानुसार शिवसेनेचा पाठिंबा अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिक यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार शिवसेनेचे शहरप्रमुख शिवाजी जाधव व दुर्गेश लिंग्रस हे नगरसेवकांना घेऊन, तर आमदार चंद्रदीप नरके हे जिल्हा परिषद सदस्यांना घेऊन उद्योग भवन येथील मतदान केंद्रावर जाणार आहेत. (प्रतिनिधी)
सेनेचा महाडिक यांना पाठिंबा
By admin | Published: December 27, 2015 1:16 AM