कोल्हापूर : अवैध मार्गाने उत्खनन करून सरकारचा महसूल बुडविणार्या कंपन्यांवर येत्या दहा दिवसांत कडक कारवाई करावी, तसेच बुडविलेल्या महसुलाची वसुली करावी, अन्यथा १४ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर व आमदार सुजित मिणचेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खनिकर्म राज्यमंत्री, विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. राज्य सरकारच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन बॉक्साईट खाणींची तपासणी केली होती. यामध्ये संबंधित कंपन्यांनी दाखविलेल्यापेक्षा कितीतरी जादा पटींनी बॉक्साईट उत्खनन करण्यात आल्याची माहिती पुढे आली. वनविभागाचे नियम पाळले नाहीत. या कंपन्यांना अठरा ते वीस फुटांपर्यंत खुदाईची परवानगी देण्यात आली होती, तेथे ४० ते ५० फुटांपर्यंत खुदाई झाली आहे. यासह अनेक गंभीर बाबी समितीसमोर आल्या होत्या. त्यामुळेच या कंपन्यांच्या विरोधात त्याचबरोबर या कंपन्यांना पाठीशी घालणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
अवैध उत्खननप्रकरणी सेनेच्या आमदारांचा उपोषणाचा इशारा
By admin | Published: May 10, 2014 12:17 AM