लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वमग्न मुलामुलींच्या विकासासाठी संवेदनशीलता आवश्यक असून यामध्ये पालक आणि शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची असते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी शालेय आरोग्य तपासणी अधिकारी आणि शिक्षण् विस्तार अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन करताना चव्हाण बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे, मेंदू विकास तज्ज्ञ डाॅ. दीप्ती चव्हाण, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डाॅ. फारूख देसाई, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. उत्तम मदने, जिल्हा साथ रोग अधिकारी डाॅ. रेंदाळकर आदी उपस्थित होते.
संजयसिंह चव्हाण म्हणाले, अशा मुलांना समजून घेऊन त्यांना नेमके काय आवडते हे शोधले पाहिजे. पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून अशा मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता येतो. मात्र, त्यासाठी संवेदनशीलता आवश्यक आहे.
डॉ. दिप्ती चव्हाण म्हणाल्या, स्वमग्नता हा आजार नसून ती मेंदू विकासातील कमतरता आहे. याचे निदान लवकर होणे आणि त्यानंतर उपचार सुरू होणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी सविस्तर सादरीकरणाव्दारे स्वमग्नतेची लक्षणे, कारणे, उपचार या बाबत मागदर्शन केले. डाॅ. योगेश साळे म्हणाले, स्वमग्न व्यक्तीकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याची दृष्टी निर्माण व्हावी हा आजच्या जनजागृती दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
०१०४२०२१ कोल झेडपी ०१
स्वमग्नता जनजागृती दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ.दीप्ती चव्हाण, डाॅ. फारूख देसाई, अजयकुमार माने, डाॅ. योगेश साळे, डाॅ. उत्तम मदने, डाॅ. रेंदाळकर आदी उपस्थित होते.