कोल्हापूर : गेल्या पाच महिन्यांपासून दूरध्वनी सेवा बंद असूनही भारत संचार निगम लिमिटेडकडून (दूरसंचार) शिरोली औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) शिये फाटा परिसरातील ग्राहकांना दरमहा बिले पाठविली जात आहेत. एक, तर खंडित झालेली सेवा आणि त्यातच बिलांचा भुर्दंड बसत असल्याने संबंधित ग्राहक त्रस्त झाले आहेत.
या एमआयडीसीतील शिये फाटापासून साधारण: अडीच किलोमीटर परिसरातील दूरसंचारची दूरध्वनी सेवा पुरविणारी लाईन बंद आहे. या परिसरात होणाऱ्या विविध कामांसाठीच्या रस्ता, साईडपट्टी खुदाईमुळे लाईन खराब झाली आहे. त्यातच दोन ते तीनवेळा या लाईनमधील काही भाग चोरीस गेला आहे. या लाईनची दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा रस्ता खुदाई आणि चोरीच्या प्रकार घडल्याने दूरध्वनी सेवा विस्कळीत होत आहे. या परिसरात ठिकठिकाणी लाईन खिळखिळी झाल्याचे दूरसंचारच्यावतीने लाईन देखभाल-दुरूस्तीचे काम पाहणाऱ्या पर्यवेक्षकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, सेवा पूर्ववत सुरू करून गैरसोय दूर करावी. सेवा बंद असतानाही गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही नियमितपणे बिले भरली आहेत. या बिलांपोटी भरलेली रकमेतून सेवा सुरू झाल्यानंतरची बिले अदा करून घ्यावीत, अशी ग्राहकांची मागणी आहे.
चौकट
दूरध्वनी सेवा मोबाईलवर देण्याचा पर्याय
या परिसरातील खुदाईमुळे सहा ते सात ठिकाणी लाईन खराब झाली आहे. त्यातील लाईनचा काही भाग चोरीस गेला आहे. एकूणच स्थिती पाहता लाईन पूर्ववत सुरू करणे शक्य नसल्याचे चित्र आहे. दूरध्वनी क्रमांक व्हर्चुअल पद्धतीने तयार करून त्यावरील सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा पर्याय आहे. सेवा खंडित असूनही ग्राहकांना पाठविण्यात आलेली बिले माफ केली जातील असे दूरसंचारचे ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर ए. आर. वाळके यांनी बुधवारी सांगितले.