कुरुंदवाड : शहराच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाच कोटी तर आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाच कोटी असा एकूण दहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील प्रलंबित याबाबतच्या विकासकामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्ते, उर्वरित डांबरी रस्ते, गटारी, उद्यान आदी विकासकामे या मिळणाऱ्या निधीतून पूर्ण करणार असल्याचे सांगून नगराध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर शहराच्या विकासासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी चार कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून शहरातील रस्ते डांबरीकरणाला सुरुवात झाली आहेत. शहरातील बाजारपेठ, नवबाग रस्ता, दलित वस्ती रस्ता, गोठणपूर रस्ता अशा एकूण चौदा मोठ्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मिळालेल्या निधीतून काही रस्ते पूर्ण झाले आहेत.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी १० कोटी रुपयाच्या निधीची घोषणा केली आहे. याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. लवकरच पालिकेच्या खात्यावर निधी जमा होणार असून शहरातील उर्वरित विकासकामे पूर्ण करणार असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्षा गीता बागलकोटे, नगरसेवक दीपक गायकवाड, अक्षय आलासे, फारूख जमादार, बाबासाहेब पाटील उपस्थित होते.