समीर देशपांडे ।गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. पदार्थ टिकविण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक रासायनिक घटक समाविष्ट केले जात आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कॅन्सरची शक्यता बळावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच आहाराच्या शैलीबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. याबाबत येथील अॅपल सरस्वती हॉस्पिटलमधील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. निखिल गुळवणी यांची मुलाखत....
प्रश्न : एकूणच बदलत्या आहारशैलीबाबत तुमचे मत काय?उत्तर : गेल्या काही वर्षांत आहारशैली बदलली आहे, हे वास्तव आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पौष्टिकतेपेक्षा चवीला जे चांगले लागते तेच खाण्याकडे सर्वांचा कल असल्याने त्याचे दुष्परिणामही जाणवायला सुरुवात झाली आहे. मधुमेह, हृदयरोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आहारशैलीबाबत दक्ष राहण्याची वेळ आली आहे, हे मात्र निश्चित.
प्रश्न : कॅन्सर कशाकशामुळे होऊ शकतो?उत्तर : अनमॉडिफाईड म्हणजे ज्यामध्ये बदल करता येत नाही असे आणि मॉडिफाईड म्हणजे ज्यामध्ये रोग होण्याची कारणे आपण टाळू शकतो अशांमुळे कॅन्सर होतो. पहिल्या भागात वय आणि अनुवंशिकतेमुळेही कॅन्सर होऊ शकतो. दुसऱ्या भागात तंबाखू खाणे, धुम्रपान, सातत्यपूर्ण मद्यपान अशा अनेक कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो.
प्रश्न : कॅन्सरच्या रुग्णांसाठी आहार कसा महत्त्वाचा ठरतो?उत्तर : आमच्याकडे चार अवस्थांमधील कॅन्सरचे रुग्ण येतात. तिसºया आणि चौथ्या अवस्थांमधील रुग्णांवर उपचार करताना प्रामुख्याने त्यांची शस्रक्रिया करावी लागते. त्यानंतर केमोचे उपचार करावे लागतात.अशावेळी त्यांचा आहार योग्य, संतुलित असेल, तर त्यांना जाणवणाºया त्रासाचे प्रमाण कमी होते.कोणत्या कारणांमुळे कॅन्सर होतो?नव्या संशोधनानुसार दुधाचे सातत्यपूर्ण सेवन हे देखील कॅन्सरची शक्यता वाढविणारे ठरत आहे. यासाठी शास्त्रीय पुरावा नसला, तरी जेव्हा विविध रुग्णांचे निरीक्षण केले जाते तेव्हा त्यातून हा निष्कर्ष काढण्यात येत आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी जनावरांना दिली जाणारी इंजेक्शन्स, भाजीपाला लवकर तयार करण्यासाठी, तसेच फळे पिकविण्यासाठी रसायने वापरली जातात.
कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे?मुळात आहाराबाबतच संतुलितपणा साधावा लागेल. नव्या संशोधनानुसार तुमच्या जेवणामध्ये ५0 टक्के सॅलेड आणि हिरव्या भाज्यांचा समावेश हवा. २५ टक्के उसळी, भात, चपात्या तर २५ टक्के चिकन, मासे यांचा समावेश असावा. ‘रेडी टु इट’पदार्थ टाळणे आरोग्याच्यादृष्टीने हिताचे ठरते. दैनंदिन व्यायाम आवश्यक आहे. लहान मुलांना आपण दुधातून बरेच काही मिश्रण करून देत असतो; परंतु अशा पावडरमध्ये साखरेचे प्रमाण खूप असते. ते हितावह नाही.