कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखाली सेवकांनी गुरुवारपासून लेखणी आणि अवजार बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाअंतर्गत सेवकांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि कुलसचिवांच्या कक्षाबाहेर ठिय्या मारला. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले. हे आंदोलन बुधवार (दि. ३०) पर्यंत चालणार आहे.
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन व अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांना सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करावी, यासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीअंतर्गत हे आंदोलन पुकारले आहे. त्याची सुरुवात शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने गुरुवारी सकाळी १०.३० वाजता केली.
प्रारंभी सेवक संघाच्या कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. त्यात संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. अतुल एतावडेकर, विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे संजय कुबल, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे आनंद खामकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आंदोलनकर्त्या सेवकांनी कुलगुरू, कुलसचिव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ व वित्त व लेखाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. तद्नंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर बसून लेखणी बंद आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला.