कोल्हापूर : विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढल्याने शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन मॉक टेस्ट (सराव चाचणी)मध्ये सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना टेस्ट देता आली नाही. वारंवार प्रयत्न करूनही लॉगिन झाले नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. ज्यांना परीक्षा देता आली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आज, बुधवारी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत टेस्ट आयोजित केली आहे.विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील ऑनलाइन परीक्षा दि. १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्याचे स्वरूप कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने परीक्षा मंडळाने सोमवारी आणि मंगळवारी मॉक टेस्ट आयोजित केली होती. राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर केल्याने परीक्षा मंडळाने सोमवारची मॉक टेस्ट मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घेण्याचे ठरविले.
सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ६७ हजार, तर दुपारी साडेतीन वाजता ६० हजार विद्यार्थ्यांची टेस्ट घेतली जाणार होती. मात्र, दुपारच्या सत्रातील अनेक विद्यार्थी १ वाजल्यापासून लॉगिन करू लागल्याने संगणकप्रणालीवर भार वाढला आणि सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यात वारंवार प्रयत्न करून लॉगिन झाले नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यांनी परीक्षा मंडळाशी संपर्क साधून नवीन पासवर्ड घेतले, तरीही अडचण कायम राहिली.
दरम्यान, सकाळच्या सत्रात २० हजार, तर दुपारच्या सत्रामध्ये ५० हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे टेस्ट दिली. उर्वरित ४० हजार जणांना टेस्ट देता आली नाही. त्यांची टेस्ट बुधवारी होणार असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.यासाठी मराठीसह अन्य भाषेत प्रश्नपत्रिकाऑनलाइन परीक्षा होणार असल्याने मराठीसह ऊर्दू, कन्नड, इंग्रजी, जर्मन, संस्कृत आदी भाषांतील प्रश्नपत्रिका युनिकोडमध्ये विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोनवर योग्य स्वरूपात दिसते का? आणि त्यामध्ये कोणती तांत्रिक अडचण आहे का? हे पाहण्यासाठी संबंधित भाषेमध्ये त्या संगणकप्रणाली उपलब्ध करून दिल्या असल्याचे गजानन पळसे यांनी सांगितले.