इंदुमती गणेशकोल्हापूर : राज्य शासनाने सर्व शासकीय यंत्रणांना काढलेल्या ई ऑफिसच्या फतव्याला सर्व्हर डाऊनचे ग्रहण लागले आहे. आता नव्याने आलेली लाडकी बहीण योजना असो, नागरिकांना द्यायचे दाखले असो, महाविद्यालयांमधील प्रवेश असो, मुद्रांकमध्ये दस्त नोंदणी असो किंवा अन्नधान्य वितरण, रेशन कार्डांमधील फेरफार असो, दैनंदिन कामकाजाची रोजची फाईल असो शासनाच्या सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये सर्व्हर डाऊनचा माेठा त्रास आहे. यावर उतारा म्हणून कर्मचाऱ्यांना रात्री काम करण्याचा सल्ला दिला जात आहे.जगभरात इंटरनेटची सेवा देणाऱ्या गुगलचा वापर कोट्यवधी लोक करत असतानाही तेथे सर्व्हर डाऊनचा कधी त्रास होत नाही. झालाच तर क्वचित इंटरनेट स्लो होतो; पण राज्य शासनाच्या एनआयसी अंतर्गत चालणाऱ्या जवळपास सगळ्या विभागांना सर्व्हर डाऊनचा त्रास आहे. ई फाईल असली तरी महिनोन्महिने सेवा मिळत नाही, दाखले मिळत नाहीत. ग्रामपंचायतींपासून ते महसूल, महापालिका, जिल्हा परिषदेपर्यंत असे कोणतेही शासकीय कार्यालय नाही जिथे सर्व्हर डाऊनचा प्रश्न नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरा आणि मंजुरीसाठी, कागदपत्रे मिळविण्यासाठी कार्यालयांचे हेलपाटे मारा अशी स्थिती आहे.
नारी शक्ती ॲप रात्रीच चालणार..लाडकी बहीण योजनेचा नारी शक्ती ॲप दिवसा सर्व्हर डाऊन असायचा. त्यामुळे अंगणवाडीसेविका व कर्मचारी रात्री बसून मोबाईलवरून, कार्यालयातून हे अर्ज भरायचे. त्यावेळी यंत्रणेवर इतका दबाव होता की, कर्मचारी रात्री हे काम करत आहेत की नाही हे बघण्यासाठी अधिकाऱ्यांना यावे लागायचे. आता अर्ज भरण्याचे प्रमाण कमी झाल्याने सर्व्हर जरा बरा चालतोय.
मुद्रांकमध्ये सात बाराच दिसत नाहीदस्त नोंदणीतून जिल्ह्यात रोज कोट्यवधींचा महसूल शासनाला मिळतो; मात्र या विभागात एलआर सर्व्हर डाऊन झाला की सात बाराच ओपन होत नाही त्यामुळे दस्त नोंदणी थांबते. एनआयसीमध्ये तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीचे काम निघाले तर मात्र पूर्ण कामच थांबते. त्याचा सर्वाधिक त्रास पक्षकारांना होतो. कारण हे लोक गावावरून आलेले असतात. त्यांचे पुढचे सगळे नियोजन कोलमडते.
ई पॉस मशीन कायमच पॉजवरअन्नधान्य वितरण कार्यालयाने रेशन दुकानदारांना धान्य व लाभ वितरणासाठी दिलेल्या ई पॉस मशीनचा कायमचा त्रास आहे. अन्य जिल्ह्यात यंत्रणा बंद पडल्याने ऑफलाईन धान्य वितरण करावे लागले आहे. याविरोधात रेशन दुकानदारांनी वारंवार पुरवठा कार्यालयाकडे तक्रार केली आहे. यासह शिधापत्रिकेतील फेरफार, बदल, नवीन शिधापत्रिका काढणे यासाठी भरलेला अर्ज सबमीटच करून घेतला जात नाही. त्यामुळे नाईलाजाने एक तर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागावी लागते नाही तर ई सेवा केंद्र, किंवा एजंटांना पैसे द्यावे लागतात.
दाखल्यांनी धरले वेठीला..महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला असे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात; मात्र त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना आणि भरल्यानंतरही सर्व्हर डाऊनमुळे दाखल्यांचा पुढचा प्रवास थांबतो. दाखलेच वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालये दाखले सादर करण्यासाठी पुरेसा वेळही देत नाहीत.