कोल्हापूर : कलासक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आम्हांला माफ कधीच करू नका...! आपण साकारलेल्या पॅलेस थिएटरचा आजवरचा स्वप्नवत वाटणारा प्रवास गुरुवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर ते अग्नितांडव बघण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नव्हते. नाट्यसंगीतासारख्या कलांचे सादरीकरण, कलाकारांना व्यासपीठ मिळावे या हेतूने आपण उभारलेल्या या नाट्यगृहाने शंभर वर्षांहून अधिक काळ मायबाप रसिक प्रेक्षकांची सेवा केली. आपल्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षातच नाट्यगृह जळताना बघून ‘हे विधात्या, तू इतका कठोर का झालास?...’ हे ‘नटसम्राट’मधील हताश वाक्य आता आठवले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज १९०२ साली युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी तेथील नाटकांच्या सादरीकरणाची मोठमोठी नाट्यगृहे, ॲम्पी थिएटर त्यांनी बघितले. हे पाहताना त्यांना आपल्या कोल्हापुरातदेखील असे एखादे नाट्यगृह असावे, अशी इच्छा निर्माण झाली. रोमवरून येताच त्यांनी या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांची पायाभरणी झाली ती ९ ऑक्टोबर १९१३ साली. पुढील फक्त दोन वर्षांत दगडी बांधकामाचे भक्कम असे भव्यदिव्य नाट्यगृह उभे राहिले. त्यावेळी त्याचे नामकरण झाले.. पॅलेस थिएटर. शाहू महाराजांचे सुपुत्र युवराज राजाराम महाराजांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर १४ ऑक्टोबर १९१५ रोजी नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. किर्लोस्कर कंपनीच्या संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग यावेळी सादर झाला.मुंबईमधील बॉम्बे थिएटरसारख्या मोठ्या नाट्यगृहानंतर त्यावेळी भारतातील हे एकमेव एवढे मोठे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत सुरू असलेले हे एकमेव नाट्यगृह होते. खासबाग कुस्ती मैदान झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी खुल्या रंगमंचावर कलाकारांना नाटक सादर करता यावे, यासाठी १९२१ साली ॲम्पी थिएटर साकारले. त्यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘मृच्छकटिक’ नाटकाने या ॲम्पी थिएटरचे उद्घाटन झाले. स्वत: शाहू महाराज या नाटकाला उपस्थित होते.संगीत नाटकांचे प्रयोग पहाटेपर्यंत चालायचे. मखमली पडदा संगीतसूर्य केशवराव भोसले यांनीच मराठी रंगभूमीवर आणला. तो काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. १९५७ साली बाळासाहेब देसाई बांधकाम मंत्री झाले तेव्हा त्यांनी या पॅलेस थिएटरचं नाव बदलून ते ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ असे केले. एक वर्षापूर्वी त्याला त्या नावाला ‘संगीतसूर्य’ जोडले गेले.यांनी साकारले होते ‘केशवराव’चे बांधकामश्रीमंत पिराजीराव बापूसाहेब घाटगे, सर्जेराव वजारत चीफ ऑफ कागल यांच्या मार्गदर्शनाखाली ओव्हरसीअर जीवबा कृष्णाजी चव्हाण यांनी नाट्यगृहाचे डिझाइन केले होते. बाळकृष्ण गणेश पंडित या ठेकेदाराने हे सुंदर नाट्यगृह साकारले. या कामात वापरलेले गर्डर्स परदेशातून मागवले होते. कुठूनही रंगमंचावर चाललेले नाटक व्यवस्थित दिसेल याची काळजी घेतली होती. स्टेजच्या खाली पाण्याचे झरे होते. खाली असलेल्या या विहिरीमुळे कलाकारांचा आवाज घुमत नव्हता. अकॉस्टिक सिस्टममुळे कोणतेही तंत्र नसलेल्या त्या काळात सगळीकडे संवाद ऐकू जायचे.प्रेक्षागृहात रंगमंचासमोरच्या खड्ड्यात बिनहाताच्या १५० लाकडी खुर्च्या होत्या. त्यामागील बाजूस शहाबादी फरशीवर बसायची सोय केली होती. नाट्यगृहाच्या शेवटी लाकडी कठडे होते. माडीवर दहा-बारा पायऱ्यांची सागवानी लाकडाची मजबूत गॅलरी होती. डाव्या व उजव्या बाजूंच्या गॅलरी स्त्रियांसाठी राखीव होत्या. राजघराण्यातील स्त्रियांसाठी स्वतंत्र दोन खोल्या व डाव्या बाजूची गॅलरी गणिकांसाठी ठेवलेली होती. नाट्यगृहात शेवटच्या प्रेक्षकापर्यंत संवाद आणि पदे ऐकू जातील, अशा खड्या आवाजात कलाकार सादरीकरण करायचे.
दिग्गज कलाकारांचे सादरीकरणया नाट्यगृहात त्या काळातील दिग्गज कलाकारांनी नाटके सादर केली. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या स्थापनेची घोषणा या नाट्यगृहात केली होती. बालगंधर्व, अच्युतराव कोल्हटकर, कानेटकर, शिलेदारांची संगीत नाटके तसेच अनेक कलाकारांनी हा रंगमंच गाजवला. रंगमंचावर कलायोगी जी. कांबळे यांनी केलेले शाहू महाराजांचे चित्र होते. नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनात रवींद्र मेस्त्री यांनी केलेला बाबूराव पेंढारकर यांचा पुतळा होता.
दुरवस्थेचे दशावतार..मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने १९८४ साली नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. तेव्हापासून नाट्यगृहाच्या दुरवस्थेचे दशावतार सुरू झाले. महापालिकेने २०१४ साली १० कोटी खर्चून नाट्यगृहाचे नूतनीकरण केले. तरीही साऊंड सिस्टमची समस्या दूर झाली नाही. वर्षापूर्वी तेथील स्वच्छतागृहाची भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. दुसऱ्या टप्प्यातील नूतनीकरण तर सुरूच झाले नाही.