कोल्हापूर : कोरोनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापुरातील विविध २२ केंद्रांवर रविवारी ६,०९० विद्यार्थ्यांनी राज्य अधिव्याख्याता पात्रता परीक्षा (सेट) दिली. विविध ३२ विषयांमध्ये ही परीक्षा झाली. दिनांक २७ जून रोजी आयोजित केलेली ही परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारत, रसायनशास्त्र विभाग, तंत्रज्ञान अधिविभाग, राजाराम कॉलेज, सायबर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, आदींसह २२ ठिकाणी परीक्षा केंद्र होती. या परीक्षेसाठी १०,२९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६,०९० जणांनी परीक्षा दिली, तर ४,२०५ जण अनुपस्थित राहिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्नॅकरने तपासणी करून आणि ओळखपत्र तपासून सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला. सकाळी दहा ते अकरा यावेळेत सामान्यज्ञान, चालू घडामोडींवरील पहिला पेपर झाला. सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड यावेळेत दुसरा पेपर घेण्यात आला. दरम्यान, मास्क, ग्लोव्हज्, सॅनिटायझरची बाटली, पाण्याची बाटली, पेन या वस्तू विद्यार्थ्यांनी बरोबर आणल्या होत्या. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात आल्याचे शिवाजी विद्यापीठ सेट समन्वयक प्रा. प्रशांत अनभुले यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
कोरोनामुळे सहा महिने सेट परीक्षा लांबणीवर पडली होती. ती रविवारी सुरळीतपणे पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.
- अजित कांबळे, विद्यार्थी
फोटो (२७१२२०२०-कोल-सेट एक्झाम ०१, ०२) : कोल्हापुरात रविवारी सेटची परीक्षा झाली. शहरातील एस. एम. लोहिया हायस्कूल येथील केंद्रावर थर्मल गनने तपासणी करून परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला.