इंदुमती गणेश ।कोल्हापूर : न्यायालय, पाटीलवाडा, पोलीस स्टेशन, दवाखाना, आलिशान बंगला, समोर सुंदर लॉन, विविध प्रकारची फुलझाडे, हायवे, बसस्टॉप, पथदिवे, आकर्षक रंगरंगोटी अशा देखण्या रूपात कोल्हापूरची चित्रनगरी चित्रपट व्यावसायिकांसाठी सज्ज झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये स्टुडिओची वानवा असताना महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील चित्रपट व्यावसायिकांना चित्रीकरणासाठी कोल्हापूर चित्रनगरीच्या रूपाने नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. आता या चि़त्रनगरीला प्रतीक्षा आहे, ‘लाईट... कॅमेरा... अॅक्शन’ची!
एकेकाळी चित्रपटसृष्टीची गंगोत्री असलेल्या कोल्हापुरातील चित्रपट व्यवसाय जगण्यासाठी चित्रनगरी हा एकमेव आशेचा किरण आहे. शासनाने दोन वर्षांपूर्वी ेचित्रनगरीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प सुरू केला. चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन हा पहिला टप्पा पार पाडला आहे. चित्रनगरीचा मुख्य स्टुडिओ आणि पाटलाचा वाडा या दोन इमारतींत जवळपास ३० ते ३२ लोकेशन्स तयार झाली आहेत. शिवाय प्रवेशद्वार, रस्ते, लॉन, बसस्टॉप, पार्किंग, पथदिवे ही बाह्य लोकेशन्स आहेत. त्यामुळे एकेकाळी खंडर आणि भूतबंगल्याचे लोकेशन झालेल्या चित्रनगरीचे आताचे देखणे रूप पाहणे हा एक सुंदर अनुभव ठरला आहे.
इतक्या सुसज्ज रूपात तयार झालेल्या चित्रनगरीची माहिती अद्याप चित्रपट व्यावसायिकांपर्यंत पोहोचलेली नसल्याने गेल्या चार महिन्यांत दोन चित्रपटांचे पंधरा-पंधरा दिवसांचे शेड्युल वगळता येथे चित्रीकरण झालेले नाही. मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये स्टुडिओ मिळत नाहीत. शिवाय त्यांचे दर जास्त असतात. त्यामुळे कोल्हापूर चित्रनगरीच्या रूपाने चित्रपट निर्माते दिग्दर्शकांना स्टुडिओ आणि लोकेशन्ससाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र त्याची माहितीच अन्य शहरांतील चित्रपट व्यावसायिकांना नसल्याने अद्याप येथे चित्रीकरणाचा ओघ सुरू झालेला नाही. त्यामुळे चित्रनगरीच्या व्यवस्थापनाला केवळ विकासावर लक्ष केंद्रित न करता तिची माहिती देशातील सर्व चित्रपट व्यावसायिकांपर्यंत तसेच मालिकेच्या निर्मात्यापर्यंत कशी पोहोचविता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.दुसरा टप्पा मंजुरीच्या प्रतीक्षेतचित्रनगरी विकासाचा दुसरा टप्पा ३० कोटींचा असून, त्यात हिंदी चित्रपटांचेही चित्रीकरण करता येईल असा भव्य स्टुडिओ उभारण्यात येणार आहे. त्याचाच खर्च जवळपास २० कोटींपर्यंत आहे. या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. परिसरात १२५० झाडे लावण्यात येणार आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या निविदाही मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.शंभरजणांना रोजगारचित्रनगरीत झालेल्या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान कोल्हापुरातील जवळपास शंभर चित्रपट व्यावसायिकांना रोजगार मिळाला. चित्रपटाच्या पथकासोबत केवळ प्रमुख कलाकार आणि कॅमेरा असतो. चित्रीकरणासाठी लागणारे अन्य साहित्य कोल्हापुरातूनच पुरविले जाते. शिवाय सहकलाकार म्हणून येथील कलाकारांनाही संधी मिळते.
चित्रनगरीची लोकेशन्स पाहायला आठवड्याला दोन-तीन चित्रपट व्यावसायिक येऊन जातात; पण चित्रनगरी चित्रीकरणासाठी सुसज्ज आहे, याची प्रसिद्धी न झाल्याने चित्रीकरणाला ओघ नाही. त्यामुळे यापुढे चित्रनगरीच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.- दिलीप भांदिगरे, प्रकल्प व्यवस्थापक