कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारावे, अशी मागणी केली आहे. कोल्हापुरातील अनेक तरुण, तरुणी संपूर्ण देशात आणि जगभरातील नामवंत आयटी कंपन्यांमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे महाडिक यांनी निवेदनात म्हटले आहे.रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या दृष्टीनेही कोल्हापूर प्रगतिशील जिल्हा असून, जिल्ह्यात आधुनिक औद्योगिक वसाहती आहेत. मात्र अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या गुणवंत अभियंता आणि तरुण, तरुणींना पुणे- मुंबई-बंगळुरू- हैदराबाद अशा ठिकाणी नोकरीसाठी जावे लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख तरुण-तरुणी आयटी क्षेत्रात संपूर्ण देशभर काम करत आहेत. जर कोल्हापुरातच सुसज्ज अत्याधुनिक आयटी पार्क हबची निर्मिती झाली, तर स्थानिक औद्योगिकरणाला आणि अर्थकारणाला मोठी गती मिळेल. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन , कोल्हापुरात आयटी पार्क हब उभारण्यासाठी लक्ष घालावे.प्रस्तावित आयटी पार्कसाठी राज्य सरकार ही सकारात्मक असून, स्थानिक पातळीवर जागा आणि अन्य पायाभूत सुविधांची उपलब्धता आहे. आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घेऊन कोल्हापुरात आयटी पार्क हबची निर्मिती करावी. यावेळी मंत्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे कोल्हापूरमध्ये आयटी पार्क होण्याची शक्यता बळावली आहे.
कोल्हापुरात आयटी पार्क हब उभारा, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:44 IST