कडेगाव : शिवाजी विद्यापीठांतर्गत होणाऱ्या ३५ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाची कडेगावात जय्यत तयारी सुरू आहे. भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयाकडे या युवा महोत्सवाचे यजमानपद आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील एक हजार पाचशे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहेत. हा युवा महोत्सव आज, बुधवारपासून सुरू होत आहे.येथील कन्या महाविद्यालयाच्या मैदानात युवा महोत्सवासाठी तीन व्यासपीठ उभारण्यात आली आहेत. सर्व सहभागी १५०० स्पर्धकांची भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहेत. आज, बुधवारपासून शुक्रवार (दि. ११)पर्यंत ३ दिवसांच्या कालावधीत युवा महोत्सव होत आहे. आज नकला, एकपात्री, शास्त्रीय गायन, सुगम गायन, शास्त्रीय ताल, नृत्य, रांगोळी, फोटोग्राफी आदी स्पर्धा होणार आहेत. गुरुवारी भारतीय समूहगीत, पाश्चिमात्य समूहगीत, लोकसंगीत, लोककला, लोकनृत्य, पथनाट्य, वादविवाद स्पर्धा आदी होणार आहेत. शुक्रवार, दि. ११ रोजी प्रश्नमंजूषा, मूकनाट्य, लघुनाटिका आदी स्पर्धा होणार आहेत.भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ. विजयमाला कदम, मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती युवा महोत्सवाची जय्यत तयारी केली आहे, असे महाविद्यालयाच्या प्राचार्या सुलक्षणा कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)आज उद्घाटनभारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या हस्ते मध्यवर्ती युवा महोत्सवाचे उद्घाटन आज होत आहे. यावेळी महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम उपस्थित राहणार आहेत.
मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी कडेगाव सज्ज
By admin | Published: September 08, 2015 10:49 PM