अंकित गोयल : सध्या नाक्यावरील नादुरुस्त यंत्रणा बसविण्यासाठी तात्पुरता पोलीस बंदोबस्त कोल्हापूर : टोलवसुली सुरू करण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने ज्या अटी घातल्या होत्या, त्या सर्व पूर्ण करण्याचे लेखी पत्र ‘आयआरबी’ कंपनीने पोलीस प्रशासनास दिले आहे. त्या अटींची पूर्तता झाल्यानंतरच टोल वसुलीसाठी बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. सध्या मात्र टोलनाक्यांवर पोलिसांना बसण्या-उठण्यासाठी बांधण्यात येणार्या शेडसाठी तसेच नाक्यावरील नादुरूस्त असलेली टेक्निकल यंत्रणा दुरुस्त करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक नाक्यावर पाच असे नऊ ठिकाणी सुमारे ४५ पोलीस कॉन्स्टेबल बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. टोलवसुलीसाठी ‘आयआरबी’ला पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची प्रत पोलीस प्रशासनास दोनवेळा ‘आयआरबी’च्या प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने बंदोबस्त पुरविण्याची आमची काहीच हरकत नाही. परंतु, टोलवसुली संदर्भात जनतेमध्ये असंतोष आहे. टोलनाक्यांवर वसुली करणारे कर्मचारी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याची तक्रार लोकांची आहे. त्यामुळे अशा कर्मचार्यांची तत्काळ हकालपट्टी करावी. नवीन नेमलेल्या कर्मचार्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांचे पोलिसांकडून दाखले घ्यावेत. त्यांना सक्तीचे ओळखपत्र द्यावे, त्यांच्याशिवाय कोणालाही त्याठिकाणी उभे करू नये. जूनमध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू होतील. त्यामुळे टोलनाक्यांवर बंदोबस्तास असणार्या पोलिसांसाठी स्वतंत्र शेडची उभारणी करावी. त्या ठिकाणीच त्यांची पिण्याच्या पाण्यासह जेवणाची सोय करावी. कारण बंदोबस्तामध्ये बहुतांश महिलांचाही समावेश आहे, अशा अटीचे पत्र पोलीस प्रशासनाने ‘आयआरबी’ प्रशासनाला दिले होते. या पोलिसांच्या सर्व अटी ‘आयआरबी’ने मान्य केल्या आहेत. त्यामुळे नाक्यावरील यंत्रणा बसविण्यासाठी तात्पुरता पोलीस बंदोबस तैनात केला आहे. अटी पूर्ण झाल्यानंतरचं टोल वसुलीसाठी पूर्णपणे बंदोबस्त पुरविला जाईल. सध्यातरी टोल वसुलीसाठी बंदोबस्त पुरविलेला नाही, असे गोयल यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
अटींच्या पूर्ततेनंतरच वसुलीस बंदोबस्त
By admin | Published: May 29, 2014 1:09 AM