कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आमचे सरकार काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही जाणतो. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, खासदार राजू शेट्टी यांना ऊसदरासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार नाही. गेल्या तीन वर्षांत सहकार क्षेत्रातील निवडणुका झालेल्या नाहीत. त्या निवडणुका ३१ डिसेंबरपूर्वी घेणार असल्याची माहिती नूतन सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, रविवारी येथे दिली.भाजप सरकारमध्ये शपथविधी घेतल्यानंतर ते आज कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आम्ही राज्य चालविणार आहोत. महाराजांच्या राज्यात जनतेला मागणी मांडावी लागत नव्हती. त्या धर्तीवर आम्ही काम करू. आमच्या राज्यात शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागणार नाहीत. ऊसदराबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल. खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत एका वृत्तवाहिनीवर ऊसदराबाबत चर्चा झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना आम्हांला समजते. त्यामुळे शेतकऱ्यांसह खासदार शेट्टी यांना ऊसदरासाठी २५ तारखेची वाट पाहावी लागणार नाही. सहकारामुळे सामान्य शेतकऱ्यांचे कल्याण झाले; मात्र काळाच्या ओघात या क्षेत्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून भ्रष्टाचार घुसला. सामान्यांपेक्षा स्वत:चे हित बघण्यात नेतेमंडळी गुंतल्याने सहकार संपला. सहकारातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य माणसाला उपयोगी पडणारा सहकार आणणार आहे. गेल्या तीन वर्षांत सहकार क्षेत्रातील निवडणुका झालेल्या नाहीत. त्या ३१ डिसेंबरपूर्वी घेणार आहोत. शिवाय सहकार कायद्यात आवश्यक सुधारणा डिसेंबर अथवा मार्चच्या अधिवेशनात करणार आहोत. आमचा शंभर दिवसांचा अजेंडा पक्का आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदर्शी आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाच तासांची बैठक झाली. यात अर्थ, ऊर्जासह चार विभागांचे सादरीकरण झाले. त्यातून नेमकी स्थिती समजली असून, शंभर दिवसांत आम्ही भरीव काम करू, अशी खात्री आहे. टोलमुक्ती, पंचगंगा प्रदूषण, तीर्थक्षेत्र आराखडा, आदी कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर माझे आग्रही प्रयत्न राहतील. (प्रतिनिधी)कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचा आम्ही निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यातून शब्द दिला आहे. हा शब्द आम्ही पाळणार आहोत. ‘रस्ते की खड्डे’ अशा प्रश्नात नागरिकांना पाडण्याऐवजी राज्यात चांगले रस्ते करण्यावर माझा भर राहणार आहे.- चंद्रकांतदादा पाटील, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्रीसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्नकोल्हापूरसह राज्याच्या विकासातील प्रत्येक विषय मला ताकदीने करावयाचा आहे. सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम यांचा पूर्ण अभ्यास करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.
ऊसदरावर २५ पूर्वीच तोडगा : चंद्रकांतदादा
By admin | Published: November 03, 2014 12:51 AM