श्रीकांत ऱ्हायकरधामोड : राधानगरी तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही शिक्षण,आरोग्य, पाणी, विज यासारख्या सेवा सुविधा म्हणाव्या तितक्या पद्धतीने पोहोचलेल्या नाहीत. या परिसरातील काही खेडेगावांमध्ये साधी विजही पोहोचलेली नाही. धामोड येथील शेवंता देसाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरामध्येही स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतर वीज आली.
धामोड येथील शेवंता देसाई नावाच्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरामध्ये अद्यापही विज नव्हती. रॉकेलच्या दिव्याचा उजेड हाच काय तो तिच्या सोबती. विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेस हा प्रसंग दिसला. क्षणाचाही विलंब न लावता एका सामाजिक भावनेतून या कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून या महिलेच्या घरात आज वीज कनेक्शन जोडले. त्यामुळे शेवंता आजींच्या घरातील दिव्याचा उजेड आज विजेच्या प्रकाशाने भेदून टाकला.धामोड ( ता. राधानगरी ) येथील शेवंता तुकाराम देसाई या आजीबाई एकट्याच राहतात. घरी अठराविश्व दारिद्र्य . राहायला नीटसे घर नाही, अत्यंत गरिब कुटुंब, पोटभर जेवणासाठी दुसऱ्याच्या घरची धुनीभांडी करून पोटचा उदरनिर्वाह चालवायचा, मग वीज कनेक्शन तरी कुठले किंवा पाणी कनेक्शनचे नाव दुरच . माहिनाभराकाठी मिळणारे जेमतेम एक लिटर रॉकेल पुरवून पुरवून वापरत संध्याकाळी लवकरच जेवण आटोपून दिवा बंद करून झोपी जाणे हा त्यांचा नित्यक्रम. शेवंता आजींच्या वाट्याला आलेले हे 'जीवन ' त्या कसलीही काकू न करता जगत होत्या . याबद्दल कुठलीही तक्रार त्यांनी केली नाही. धामोड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सबस्टेशनचे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सर्कल संघटक विलास डवर व त्यांचे सहकारी निलेश पोतदार, दत्तात्रय जाधव, अमर फराकटे, युवराज चौगुले, उमेश कांबळे,शेखर जाधव, कपिल चौगुले, यांना लाईट बील वसुली दरम्यान या आजींच्या घरी लाईट नाही ही बाब लक्षात आली.
त्यांनी तात्काळ शाखा अभियंता टंकसाळे यांना ही घटना सांगितली व कनेक्शनसाठी लागणारा खर्च सर्व कर्मचाऱ्यांनी गोळा करत एका सामाजिक भावनेतून अवघ्या दोनच दिवसात या आजीबाईंच्या घरी लाईट जोडून देण्याचे काम केले. गेल्या कित्येक वर्षापासून ज्या घरात फक्त दिव्याचा उजेड चमकत होता . त्याची जागा आज लख्ख प्रकशाच्या बल्बने घेतली. त्यामुळे शेवंता आजींच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद पहायला मिळाला .