- विश्वास पाटीलकोल्हापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सात माजी खासदारांचीच मुले पुन्हा खासदार म्हणून निवडून आली आहेत. या निवडणुकीत बहुतांशी सर्व उमेदवार हे राजकीय व आर्थिकदृष्ट्या प्रस्थापित घराण्यातीलच निवडून आले आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा, फारशी राजकीय ताकद नसणारा; परंतु लोकांनी काम पाहून निवडून दिले,असा एकही खासदार नाही. यंदाच्या निवडणुकीचे हेदेखील वैशिष्ट्यच आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या घराणेशाहीला बळ दिले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आलेले दोन्ही खासदार ‘वारस’दार आहेत. शिवसेनेचे संजय मंडलिक यांचे वडील दिवंगत सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीचे चारवेळा खासदार होते. खासदार धैर्यशील माने यांचे आजोबा बाळासाहेब माने हे काँग्रेसचे पाचवेळा खासदार होते, तर त्यांच्या आई श्रीमती निवेदिता माने या राष्ट्रवादीच्या दोनवेळा खासदार होत्या.याशिवाय वडील खासदार असलेले व या निवडणुकीत विजयी झालेल्यांत सुप्रिया सुळे (शरद पवार), पूनम महाजन (प्रमोद महाजन), रणजीतसिंह निंबाळकर (हिंदुराव नाईक-निंबाळकर), डॉ. प्रीतम मुंडे (गोपीनाथ मुंंडे), भावना गवळी (पुंडलिक गवळी) यांचा समावेश आहे.अहमदनगर मतदार संघातून विजयी झालेले डॉ. सूजय विखे-पाटील यांचे आजोबा बाळासाहेब विखे-पाटील हे काँग्रेसचे खासदार होते. राष्ट्रवादीचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुतणे आहेत. सातारा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचेच माजी खासदार अभयसिंहराजे भोसले यांचे पुतणे आहेत.याशिवाय राज्यात मंत्री, आमदार म्हणून काम केलेल्या कुटुंबातीलही अनेकजण निवडून आले आहेत. त्यामध्ये डॉ. हीना गावित (माजी मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या), रक्षा खडसे (माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून), डॉ. भारती पवार (माजी आमदार ए. टी. पवार यांची सून), डॉ. श्रीकांत शिंदे (विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा), डॉ. सूजय विखे-पाटील (माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा) व स्वत: मंत्री राहिलेले व आता खासदार म्हणून विजयी झालेल्यांत गिरीश बापट, सुनील तटकरे, गजानन किर्तीकर यांचा समावेश आहे.>हे असे का होते..?लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो; त्यामुळे नवख्या उमेदवारास संधी दिल्यास लोकांपर्यंत पोहोचण्यास अडचणी येतात. त्याऐवजी प्रस्थापित कुटुंबातील उमेदवार असेल तर त्याची मतदारसंघाला ओळख असते. किमान त्यांचे आडनाव तरी यापूर्वी लोकांपर्यंत पोहोचलेले असते, असा विचार राजकीय पक्षांकडून होतो. कोल्हापुरात मंडलिक व माने यांना घराण्याच्या या वारशाचाही मोठा उपयोग निवडणुकीत झाल्याचे दिसत आहे.
सात माजी खासदारांची मुले पुन्हा ‘खासदार’; प्रस्थापितांचेच राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:36 AM