येथील पाणवठा घाटाची दुरावस्था झाल्याचे वृत्त ''लोकमत''ने ४ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या आमदार फंडातून सात लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे बुबनाळ ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कन्यागत महापर्व काळामध्ये शिरोळ तालुक्यातील अनेक गावांतील नदीकाठालगत पाणवठे घाटाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, बुबनाळला पाणवठ्यावरील घाटासाठी कोणताही निधी मंजूर झाला नाही. गेल्यावर्षी आलेल्या महापुरात घाटाची दुरावस्था झाली आहे. पायऱ्या निघून बांधकाम खराब झाले आहे. नदीतील गाळ, त्यात झाडे-झुडपे उगवून सांडपाणी घाटावरून नदीत मिसळत आहे. याबाबत ‘लोकमत’ने ४ नोव्हेंबरच्या अंकात ''बुबनाळमध्ये नदी पाणवठ्याची दुरावस्था'' अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल आमदार सदाभाऊ खोत यांनी घेऊन तत्काळ निधी मंजूर केला. या निधीसाठी रयत क्रांतीचे जिल्हा युवा अध्यक्ष आकाश राणे, तालुका उपाध्यक्ष अल्ताफ मुल्ला, शालेय समितीचे अध्यक्ष अर्जुन केरीपाळे, सुधीर शहापूरे, महादेव शहापुरे आदींनी प्रयत्न केले.
कोट - बुबनाळ पाणवठ्याची दुरवस्था झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये आल्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडे निधी मागणी केली होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ सात लाखांचा निधी मंजूर केला.
- आकाश राणे, रयत क्रांती जिल्हा युवा अध्यक्ष