राम मगदूम -- गडहिंग्लज --१२५ वर्षांच्या गडहिंग्लज नगरपालिकेच्या इतिहासात मुस्लिम समाजातील पहिले नगरसेवक होण्याचा मान दिवंगत युसूफसाहेब गौस मुल्ला यांना, तर त्यांचेच सुपुत्र अकबरभाई यांना मुस्लिम समाजातील पहिले नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. गेल्या ४० वर्षांत सात मुस्लिम बांधवांना सभागृहात प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. त्यापैकी हालिमा अब्दुल नदाफ या आजपर्यंतच्या एकमेव मुस्लिम महिला नगरसेविका होत.१९७४ मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची पहिली निवडणूक झाली. त्यावेळी काँगे्रसचे डॉ. घाळी विक्रमी बहुमताने निवडून आले, तर विरोधी जनता आघाडीला बहुमत मिळाले होते. त्यावेळी युसूफसाहेब मुल्ला व हालिमा नदाफ हे दोघेही जनता आघाडीतर्फे निवडून आले होते.१९८५मध्ये काँगे्रसप्रणीत आघाडी विरोधातील निवडणूक जनता आघाडीने बहुमताने जिंकली. त्यावेळी हारुण सय्यद हे जनता आघाडीतर्फे, तर हनिफ मुल्ला व इब्राहिम बेडक्याळे हे दोघे काँगे्रसकडून निवडून आले होते. १९९१ मध्ये सत्ताधारी जनता आघाडी आणि विरोधी काँगे्रसप्रणीत सर्वपक्षीय राजर्षी शाहू आघाडीत लढत झाली. त्यावेळी काँगे्रसचे ताजुद्दीन सौदागर हे शाहू आघाडीतर्फे निवडून आले होते.१९९६ मध्ये सत्ताधारी शाहू आघाडीचा पाडाव करून विरोधी जनता आघाडीने पुन्हा पालिकेची सत्ता ताब्यात घेतली. नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले असतानाही पहिल्यांदाच निवडून आलेल्या अकबर मुल्ला यांना जनता आघाडीने नगराध्यक्षपदाची संधी दिली. त्यांच्या रूपाने मुस्लिम समाजाला प्रथमच नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. २००१मध्ये सत्ताधारी जनता आघाडीच्या विरोधात राष्ट्रवादीप्रणीत सर्वपक्षीय महालक्ष्मी आघाडी थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह बहुमताने सत्तेवर आली. त्यावेळी राष्ट्रवादीतर्फे हारुण सय्यद हे निवडून आले होते. २००६ मध्ये सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीच्या विरोधातील जनता आघाडीने पुन्हा पालिकेची सत्ता काबीज केली. त्यावेळी सभागृहात एकही मुस्लिम नगरसेवक नव्हता.२०११ मध्ये तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीविरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातील अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने केवळ एका जागेच्या बहुमताने सत्ता मिळविली. त्यावेळीदेखील एकही मुस्लिम नगरसेवक सभागृहात नव्हता. अनुभवी सय्यद यांनाच राष्ट्रवादीने स्वीकृत नगरसेवकपदाचा मान दिला. सर्वाधिक काळ तेच सभागृहाचे सदस्य आहेत.
४० वर्षांत सात मुस्लिम बांधवांना संधी
By admin | Published: November 18, 2016 11:00 PM