अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर सात सदस्यांचा राजीनामा, एक मत फुटल्याने निर्णय व
सरपंच निवडीत घोडेबाजार झाल्याचा आरोप
अर्जुनवाड : अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीवेळी सत्ताधारी राजश्री शाहू विकास आघाडीमधील एक सदस्य फुटल्याने सत्ता गेली. या कारणामुळे १३ पैकी ७ सदस्यांनी आपला राजीनामा ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई यांच्याकडे दिला आहे. यामध्ये नूतन ग्रा. पं. सदस्य नंदा खोत, संगीता चौगुले, भारती परीट, शोभा डोंगरे, संतोष पाटील, संतोष दुधाळे, परशुराम बागडी यांनी राजीनामा दिला आहे.
अर्जुनवाड ग्रामपंचायतीची सरपंच निवड आज गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी राजर्षी शाहू विकास आघाडीची सदस्य संख्या सात, तर अर्जुनेश्वर विकास आघाडी व अपक्ष अशी सदस्य संख्या सहा आहे. सरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या गुप्त मतदानामध्ये शाहू आघाडीचा एक सदस्य फुटल्याने अर्जुनेश्वर आघाडी व अपक्ष गटाची सत्ता आली आहे. यावेळी सरपंचपदाच्या उमेदवार स्वाती कोळी, उपसरपंचपदाचे उमेदवार विश्वनाथ कदम प्रत्येकी सात मते मिळाल्याने त्यांची निवड झाली. शाहू आघाडीतील कोण सदस्य फुटला आहे, हे न कळल्यामुळे आघाडीच्या सात सदस्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई यांच्याकडे राजीनामा दिला. या निर्णयाने अर्जुनवाड गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या निवडणुकीत शाहू आघाडीतील एक सदस्याने गद्दारी केल्याने सत्ता गमवावी लागली; पण राजीनामा दिल्याने मतदारांचा अनादर झाला असल्याची चर्चा होत आहे. याबाबत पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष्य लागले आहे.
चौकट
याबाबत आघाडीप्रमुख यांनी ग्रामपंचायत बरखास्त करून सर्व ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे जाहीर केले आहे, तर उपसरपंचपदाची निवडणूक लढवणारे आघाडीचे उमेदवार संतोष पाटील यांनी या प्रकारात घोडेबाजार झाला असून, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.