समीर देशपांडेकोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) एका सप्टेंबर महिन्यात २२८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तब्बल २९ बालकांचाही समावेश आहे. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एका दिवसात २४ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे हे चित्र समोर आले आहे. मात्र, या ठिकाणी औषधांची टंचाई नसल्याचे तसेच यातील ६५ मृत्यू हे रुग्ण दाखल झाल्यापासून २४ तासांतील असल्याचेही सांगण्यात आले.राज्यात याआधी नागपूर, नाशिक आणि आता नांदेड येथे रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीपीआर रुग्णालयातही सप्टेंबर महिन्यात असा एकही दिवस गेलेला नाही की, ज्या दिवशी मृत्यू झालेला नाही. याची वेगवेगळी कारणे आहेत. या २२८ मृतांपैकी ६५ जणांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल केल्यानंतरच्या २४ तासांतच झालेला आहे.जिल्ह्याच्या बाराही तालुक्यांतील शासकीय रुग्णालयातून, कोल्हापूर, इचलकरंजीसह मोठ्या शहरांमधील खासगी रुग्णालयांमधून तिथे उपचार करणे थांबले की मग अतिगंभीर रुग्णांना सीपीआरला पाठवले जाते. या रुग्णांची आधीच्या रुग्णालयात प्रकृती न सुधारता ती खालावत चालल्याने सीपीआरला पाठवले जाते. काही वेळा काही रुग्णांची आर्थिक परिस्थितीही नाजूक असल्याने नातेवाईक अशांना सीपीआरमध्ये दाखल करतात. या ठिकाणचे उपचार मोफत असल्याने त्याचाही फायदा झाला तर झाला असाही एक विचार असतो. परंतु, असे अतिगंभीर रुग्ण बहुतांशी वेळा मृत्यू पावतात.या २२८ मृत रुग्णांमधील १६३ रुग्ण हे २४ तासांनंतर मृत्यू पावलेले आहेत. अनेक आजारी, वयस्कर रुग्णांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. त्यांची परिस्थिती पाहून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतात. अशा १६३ जणांचा महिन्याभरात मृत्यू झाला आहे. कमी वजनाची बाळे हा आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा प्रश्न असून, सप्टेंबर २०२३ मध्ये अशा २९ बालकांचा मृत्यू झाला आहे. वजन अतिशय कमी असणे, जन्मताच बाळाला श्वासोच्छवासाचा त्रास होणे अशा अनेक कारणांमुळे या बालकांचा मृत्यू झाला आहे.
सीपीआरमधील ज्या रुग्णांचे मृत्यू झाले आहेत ते २२८ सर्व रुग्ण हे अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेणारे होते. सर्वसाधारण वॉर्डमधील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. औषधसाठा पुरेसा आहे. अतिगंभीर रुग्णांना आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्यांना शेवटच्या टप्प्यात सीपीआरमध्ये दाखल केल्यामुळेही मृतांची संख्या जास्त आहे. - डॉ. प्रकाश गुरव, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर