कोल्हापूर : जप्त केलेले वाहन दंड भरून परत हवे तर प्रथम ॲंटिजन चाचणी करा, या बंधनकारक केलेल्या नियमामुळे सोमवारी वाहने सोडविण्यासाठी आलेल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले. दिवसभरात तब्बल १३५ जणांची कोरोनाबाबत ॲंटिजन चाचणी करण्यात आली, त्यामध्ये तब्बल सात जण पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. विनाकारण कोणीही रस्त्यावर येऊ नये यासाठी निर्बंध घातले आहेत; पण तरीही अनेकजण वाहनांसह रस्त्यावर येत आहेत. अशी वाहने जप्त करण्यात येत आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शहरातील पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांद्वारे जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
जप्त केलेली वाहने तब्बल आठवड्यानंतर दंड भरून परत केली जात आहेत. वाहने नेताना गर्दी झाल्यास ॲंटिजन चाचणीचा पर्याय शहर वाहतूक शाखेतर्फे केला जात आहे. सोमवारी वाहने नेण्यासाठी शाखेबाहेर गर्दी झाली. पोलीस निरीक्षक स्मिता गिरी यांनी महापालिकेच्या कोरोना चाचणी पथकास पाचारण केले. अनेकांनी ॲंटिजन चाचणीची धास्ती घेतल्याने वाहन नेण्याऐवजी ते रिकाम्या हाताने परतले. जे राहिले अशांना रांगेत उभे राहून त्यांची ॲंटिजेन चाचणी केली. सायंकाळपर्यंत सुमारे १३५ जणांची ॲंटिजन चाचणी केली, त्यामध्ये सात जण युवक पॉझिटिव्ह आल्याने त्यांना महापालिकेच्या पथकामार्फत कोविड केंद्रात अलगीकरण केले.