इचलकरंजी : गणेशमूर्ती विसर्जनावेळी कर्णकर्कश आवाजात डॉल्बी सिस्टीम लावल्याबद्दल इचलकरंजी साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश नेजे यांच्यासह सातजणांवर गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये ट्रॅक्टरचालक व जनरेटर मालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी नेजे यांच्या घरची गणेशमूर्ती इचलकरंजी साऊंड असोसिएशन या नावाखाली विसर्जनासाठी रस्त्यावर आणून त्याची मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक सायंकाळी चार वाजल्यानंतर जनता चौक ते गांधी पुतळा या मार्गावर होती. तेव्हा मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर व ट्रॉली (एमएच ०९ यू ७९२९ व एमएच ०९ यू २७०३) वर डॉल्बी साऊंड सिस्टीम लावण्यात आले होते. ही डॉल्बी सिस्टीम मोठ्या आवाजात असल्यामुळे पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्यावेळेला त्याचा आवाज १२१.२ डेसीबल असल्याचे आढळून आले. म्हणून पोलिसांनी कारवाई करीत डॉल्बी सिस्टीम बंद केली. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात ध्वनि प्रदूषणाचा भंग केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये नेजे (रा. महाराणा प्रताप चौक) यांच्यासोबत जनार्दन केसरकर (रा. गणेशनगर), सुभाष बुचडे (रा. वेताळ पेठ), प्रवीण रावळ (रा. सुतार मळा, हे सर्व साऊंड असोसिएशनचे पदाधिकारी आहेत), ट्रॅक्टरचालक दीपक वाघमारे (रा. आमराई मळा), साऊंड सिस्टीम चालक राहुल धुमाळ (रा. भोनेमाळ) आणि जनरेटर मालक विशाल डेकोरेटर्स (रा. चोकाक, ता. हातकणंगले) यांचा समावेश आहे.
डॉल्बीप्रकरणी सातजणांवर गुन्हा
By admin | Published: September 12, 2016 12:43 AM