आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १८ : दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेले लोखंडी ग्रील तोडून एका नामांकित कंपनीच्या कपड्याच्या शोरूममध्ये लॉकर्समध्ये ठेवलेले सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी शाहूपुरी पाच बंगला परिसरात उघडकीस आली.
चोरट्याने चेजिंग रूमच्या प्लायवूडचे छत फोडून आत प्रवेश करून लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार समजताच शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्यासह शहरातील चारही पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी दुपारी भेट देऊन पाहणी केली. याबाबतची फिर्याद व्यवस्थापक महेश अशोक घोडके (रा. जरगनगर,कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शाहूपुरी रेल्वे फाटक ते राजारामपुरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समध्ये सतीश माने यांच्या मालकीचे नामांकित कंपनीचे कपड्याचे शोरूम आहे. या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून महेश घोडके तर कॅशियर म्हणून शोभा संभाजी गायकवाड (रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर, कोल्हापूर)या काम करतात. गुरुवारी सकाळी महेश घोडके हे शोरूम उघडण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना लाईट सुरू असल्याचे दिसले. ते दरवाजा उघडून शोरूममध्ये गेले असता शोरूममधील साहित्य विस्कटलेले तर चेजिंग रूममधील छतावरील प्लायवूड फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेथून ते लॉकर्सजवळ गेले असता लॉकर्समध्ये शोभा गायकवाड यांनी ठेवलेले दागिने गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी हा चोरीचा प्रकार गायकवाड यांना सांगून पोलिसांना हा प्रकार कळविला. त्या तत्काळ शोरूममध्ये आल्या.
दरम्यान, याची दखल घेत तत्काळ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोरूमची पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यामध्ये सोन्याच्या बांगड्या, अर्धा तोळ्याची सोन्याची चेन, पोवळा, मणी-मंगळसूत्र असा सुमारे सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. पोलिसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी या शोरूम शेजारील असलेल्या अन्य दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, कॅशियर शोभा गायकवाड या दौलतनगर परिसरात राहतात. त्यामुळे त्यांनी हे दागिने सुरक्षित राहावे यासाठी त्यांनी शोरूममधील लॉकर्समध्ये ठेवले होते, असे महेश घोडके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अल्पवयीन मुलाकडून प्रकार शक्य शाहूपुरी पाच बंगला परिसरात असलेल्या या कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस एक छोटासा बोळ आहे. या शोरूमच्या पाठीमागील बाजूस लोखंडी छोटी ग्रील आहे. त्यातील एक ग्रील तोडण्यात आले होते. हे ग्रील पोटमाळ्याला लागून आहे. त्यामुळे या पोटमाळ्यावर लाथ मारून त्यावरील प्लायवुड फोडण्यात आला आहे. तेथून थेट प्रवेश चेजिंग रूममध्ये होतो. या रूममधून सरळ शोरूममध्ये प्रवेश जातो. त्यामुळे एवढ्या निमुळत्या जागेतून याठिकाणी आलेला चोरटा हा अल्पवयीन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.