- वसंत भोसले कोल्हापूर : महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी सतरा खासदार प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक आठजणांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक वेळा निवडून गेलेल्यांची संख्या एकतीस असून शिवसेनेच्या भावना गवळी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची निवड सलग पाचव्यांदा झाली आहे. उर्वरित सर्वजण एकापेक्षा अधिक आणि जास्तीत जास्त चारवेळा निवडले गेले आहेत.प्रथमच निवडून आलेल्यांमध्ये शिवसेनेचे चार, भाजप आठ, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेस एक, अपक्ष १ आणि एमआयएम एक अशी विभागणी आहे. शिवसेनेमध्ये हेमंत पाटील (हिंगोली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), संजय मंडलिक (कोल्हापूर) आणि धैर्यशील माने (हातकणंगले) यांचा समावेश आहे.भाजपमध्ये आठ जणांचा समावेश आहे. त्यात डॉ. भारती पवार (दिंडोरी), मनोज कोटक (मुंबई-ईशान्य), उन्मेश पाटील (जळगाव), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), गिरीष बापट (पुणे), सुजय विखे (नगर), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (माढा).राष्ट्रवादीने दोन नवे चेहरे दिले आहेत. त्यात सुनील तटकरे (रायगड) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नवनीत राणा (अमरावती) या प्रथमच विजयी झाल्या आहेत. शिवाय औरंगाबादमधून सातत्याने निवडून येणारे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून इम्तियाज जलिल (एमआयएम) यांनी लोकसभेत प्रवेश केला आहे. काँग्रेसतर्फे एकमेव उमेदवार महाराष्ट्रातून विजयी झाला आहे. आणि त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविरुद्ध बंड पुकारले. शिवसेनेचा ऐनवेळी राजीनामा देऊन काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि ते निवडूनही आले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना) आणि भावना गवळी (यवतमाळ-वाशिम) हे दोघेही पाचव्यांदा निवडून आले आहेत. गिरीष बापट (भाजप-पुणे) आणि सुनील तटकरे (राष्ट्रवादी-रायगड) त्यांच्या पक्षात ज्येष्ठ नेते मानले जातात. ते राजकारणात नवखे नाहीत, पण लोकसभेत प्रथमच प्रवेश करत आहेत. बापट सध्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. विद्यमान मंत्रिमंडळातील ते एकमेव मंत्री लोकसभा निवडणुकीत उतरले होते.>अचानक प्रवेश, विजयही मिळविलाडॉ. भारती पवार (राष्ट्रवादी ते भाजप), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (काँग्रेस ते भाजप), धैर्यशील माने (राष्ट्रवादी ते शिवसेना), धानोरकर (शिवसेना ते काँग्रेस), सुजय विखे (काँग्रेस ते भाजप), जयसिद्धेश्वर स्वामी (मठातून थेट भाजपमध्ये), डॉ. अमोल कोल्हे (शिवसेना ते राष्ट्रवादी) आदी सातजणांनी लोकसभेपूर्वी पक्षांतर करून उमेदवारी घेतली आणि विजयीसुद्धा झाले.
महाराष्ट्राचे लोकसभेत सतरा नवे चेहरे, दोघांची पाचव्यांदा वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 4:46 AM