कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जासाठी लागणारे ७/१२, ८अ, नमुना नं.६ इत्यादी उतारे यापुढे केडीसीसी बँकेतच अवघ्या १५ रुपयांत मिळणार आहेत, सर्व शाखामध्ये ही सुविधा उपलब्ध असेल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री व बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली आहे. या निर्णयामुळे बॅंकेच्या कर्जासाठी लागणारे उतारे बाहेरून आणण्याच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून कर्ज मिळण्याची प्रकियाही सुलभ झाली आहे.
जिल्हा बॅंक संचालक मंडळाची बैठक मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ विकास सेेवा संस्थाचे कर्जदार सभासद शेतकऱ्यांना उताऱ्याच्या वितरणाने झाला. यावेळी मुश्रीफ म्हणाले, शेतकरी हाच बँकेचा केंद्रबिंदू असल्याने त्यांना सर्वाधिक पीक कर्ज दिले जाते. सातबारा उतारा पाहून होणाऱ्या या कर्जवाटपात हे उतारे लवकर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्यानेच हा निर्णय घेतला आहे.
बैठकीला संचालक व माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, आर. के. पोवार, सर्जेराव पाटील-पेरीडकर, अशोकराव चराटी, प्रताप ऊर्फ भय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, उदयानीदेवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.
चौकट
पहिले लाभार्थी...
झाकीरहुसेन साहेबहजरत पटेल (अमरापूर सेवा संस्था औरवाड, ता. शिरोळ)
काशिनाथ कल्लाप्पा विभुते (यशवंत सेवा संस्था हुनगिनहाळ, ता. गडहिंग्लज
संभाजी मारुती पाटील (माले ता. पन्हाळा)
चौकट
उताऱ्याचा सर्व खर्च बॅंक उचलणार
मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी केलेल्या सामंजस्य करारामुळे हे उतारे उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीची प्रतिउतारा १५ रुपये रक्कम शासनाकडे जमा होणार आहे. उतारा काढण्यासाठीची लागणाऱ्या यंत्रणेचा खर्च बॅंक स्वत: उचलणार आहे.
फोटो 01062021-कोल- केडीसी बॅंक
फोटो ओळ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेल्या कर्ज योजनेचे पहिले लाभार्थी म्हणून औरवाड येथील अमरापूर सेवा संस्थेचे सभासद शेतकरी झाकीरहुसेन साहेबहजरत पटेल यांना बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी उतारा दिला.