कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.शहराचा खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्या १२ दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता बरीच सुधारणा झाली. बुधवारी बालिंगा, नागदेववाडी, कसबा बावडा उपसा केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होते. शिंगणापूर येथील पुईखडीचे दोन तसेच कसबा बावड्याचे दोन मोटरी सुरू होत्या. पुईखडीसाठीची आणखी एक मोटार बुधवारी रात्री साडेदहा वाजता जोडण्यात आली. उर्वरित मोटार ही आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत जोडली की १०० टक्के उपसा व जलशुद्धिकरण यंत्रणा कार्यान्वित होईल.शहरातील ए, बी, सी व डी भागांना तसेच कसबा बावडा ते कावळा नाका परिसरातील १८ प्रभागांना बुधवारी अपुरा व कमी दाबाने पाणी मिळाले. मात्र कावळा नाका टाकी व राजारामपुरी टाकीवर अवलंबून असलेल्या शिवाजी पार्क, राजारामपुरी सर्व गल्ल्या, रुईकर कॉलनी, भोसलेवाडी, कदमवाडी, शाहूपुरीचा काही भाग येथे पाणी मिळालेले नाही. उद्या, शुक्रवारी या भागास पाणी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.यांत्रिकी विभागाचे उपअभियंता रामदास गायकवाड गेल्या १२ दिवसांपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी झटत आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच ‘स्मॅक’च्या पदाधिकाऱ्यांनीही मोठी मदत केली. रेनबो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे काशीनाथ शिंदे यांनीही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. विद्युत सल्लागार असलेल्या शिंदे यांची झालेली मदत मोठी असून त्यांच्याशिवाय पाणीपुरवठा इतक्या कमी कालावधीत सुरू होणे अशक्य होते, असे गायकवाड यांनी सांगितले.शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे अजूनही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कळंबा फिल्टर हाऊस येथून १७८, कसबा बावडा येथून ५३, तर राजारामपुरी येथून २८ असे २५९ टॅँकर पाणी पुरविण्यात आले.