कोल्हापूर : लोकसभेसाठी जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये मंगळवारपासून ज्येष्ठ व दिव्यांगांच्या होम व्होटिंगला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर मतदारसंघासाठी २ हजार ७४० तर हातकणंगले मतदारसंघासाठी ५६१ नागरिकांनी टपाली मतदानाद्वारेमतदानाचा हक्क बजावला. आज ज्येष्ठ व दिव्यांगांच्या टपाली मतदानाचा अखेरचा दिवस असून शंभर टक्के मतदार होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. वयाच्या ८५ वर्षांवरील ज्या ज्येष्ठांना तसेच ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत येता येणार नाही, त्यांच्यासाठी यंदा पहिल्यांदाच घरून टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी ३ हजार ७४३ ज्येष्ठ व दिव्यांगांनी १२ डी अर्ज भरून घरून मतदानाची मागणी केली होती. त्यानुसार विधानसभा मतदारसंघनिहाय शासकीय कर्मचारी, पोलिस यांचा समावेश असलेले पथक स्थापन करण्यात आले होते.बुधवार (दि. १) मेपासून घरून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ हाेती. प्रत्येक पथकाला दिवसभरात किमान १५ नागरिकांचे टपाली मतदान घ्यायचे होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत ३ हजार ३०१ ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांचे मतदान घेण्यात आले. आज शुक्रवारी या मतदानाचा अखेरचा दिवस आहे. दिवसभरात या नागरिकांचे शंभर टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा आहे.
कोल्हापूर मतदारसंघासाठी झालेले होम व्होटिंग
- ८५ वर्षांवरील मतदार : १ हजार ९४१
- दिव्यांग मतदार : ४०३
- एकूण २ हजार ३४४
- शिल्लक मतदार : ३७९
हातकणंगले मतदारसंघासाठी झालेले होम व्होटिंग
- ८५ वर्षांवरील मतदार : ७९९
- दिव्यांग मतदार : १५८
- एकूण : ९५७
- शिल्लक मतदार : ६३
घरात येऊन मतदान करून घेतात हे सोयीचे असले तरी त्यासाठीची प्रक्रिया वेळखाऊ आहे याचा अनुभव मी गुरुवारी घेतला. त्यामुळे मी विधानसभेला केंद्रावर जाऊनच मतदानाचा अधिकार बजावण्याचा निर्णय घेतला आहे. -दिव्यांग मतदार, कोल्हापूर