कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याच्या खालील व वरील बाजूने तसेच नदीकाठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीवेळी स्पष्ट झाले. सोमवार व मंगळवारी ही पाहणी करण्यात आली, तसेच जेथे सांडपाणी मिसळते तेथील पाण्याचे नमूने रासायनिक पृथ्थकरणासाठी घेण्यात आले.प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे संस्थापक दिलीप देसाई यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने पंचगंगा नदीकाठाने कसबा बावडा ते शिये पूल येथे पाहणी करण्यात आली. सोमवार व मंगळवारी ही पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.पाहणी दरम्यान सोमवारी कसबा बावडा- शिये पूल दरम्यान पंचगंगा नदीत मध्यम आकाराचे मासे मृत झाल्याचे आढळून आहे.
पंचगंगा नदीतील पाण्याचा नमुना पृथ्थकरणासाठी घेण्यात आला. मंगळवारी पाहणी दरम्यान कारखान्याच्या प्रक्रिया केलेली सांडपाण्याची पाईप लाईन (नागाव गावास जाणारी) एअर व्हॉल्व्ह थोड्या प्रमाणात लिकेज असल्याचे आढळून आले. राजाराम बंधाऱ्याच्या वरील व खालील बाजूने कसबा बावडा परिसरातून येणारे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे आढळून आले.महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची दुधाळी व कसबा बावडा येथे पाहणी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही ठिकाणाहून प्रक्रियायुक्त सांडपाणी सोडत असल्याचे दिसून आले. नदीकाठावरील गावामधून काही प्रमाणात घरगुती सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरभड यांनी याबाबतचा पाहणी अहवाल तयार केला आहे.