समीर देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कात्री, सुई, दोऱ्यासह प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन पुरविण्याची योजना जिल्हा परिषदेने आखली आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, येत्या महिन्याभरात ही योजना मार्गी लावण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ५ टक्के स्वनिधीतून समाजकल्याण विभागाच्यावतीने ही योजना आखण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला शिलाई मशीन खरेदीसाठी ४७०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, अनेकवेळा केवळ लाभार्थ्याला शिलाई मशीन दिले तर त्याचा वापर होईलच किंवा झालाच तर प्रभावीपणे होईल की नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघात अशा ७२ प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये पाच दिवस या सहभागी होणाऱ्या दिव्यांगांना शिलाईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा १४४० लाभार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी त्यांना कात्री, टेप, सुई, दोरा बंडल, स्केच वही, माहिती पुस्तिका, स्केच व बॅग असे कीट देण्यात येणार आहे. यासाठी १८ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी ११ वैद्यकीय सामाजिक कार्यकर्तेही नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी कंत्राटी पद्धतीने केवळ एक महिन्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरामध्ये २० जण सहभागी होऊ शकतील. त्यांना दिवसभरामध्ये चहा, नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा, बिस्किटे देण्यात येणार आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येणार असून, यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ वस्तू पुरवठा करण्यापेक्षा संबंधित दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन वस्तूचा पुरवठा केल्यास प्रत्यक्षात एक चांगली रोजगाराची संधी त्यांना मिळेल, असा आशावाद आहे.
कोट
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना रोख निधीचे वितरण करण्यात आले आहे. याच पद्धतीने आता केवळ शिलाई मशीनसाठी अनुदान न देता त्याबरोबरच त्यांना प्रशिक्षण देण्याचीही योजना आखण्यात आली आहे. या लाभार्थ्यांची निवड जिल्हा परिषद सदस्यांनीच करावयाची आहे.
दीपक घाटे
जिल्हा समाजकल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद कोल्हापूर