कोल्हापूर : पोलीस उपअधीक्षकासह त्याच्या कुटुंबीयाने दत्तक घेतलेल्या चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पीडित मुलाचा शारीरिक व मानसिक छळ करून त्याच्या गुप्तांगासह पाठीवर लायटरने असंख्य चटके दिले आहेत. या उपअधीक्षकाच्या तावडीतून सोमवारी ‘चाईल्ड लाईन’ संस्थेने मुलाची सुटका केली असून त्याला एका शासकीय संस्थेत सुरक्षित ठेवले आहे. मुलावरील अत्याचार पाहून संस्थेने पोलिसांत धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू होत्या.
‘खाबूगिरी’मध्ये काही वर्षांपूर्वी हा पोलीस उपअधीक्षक निलंबित झाला आहे. तो पत्नी व मुलीसोबत ताराबाई पार्क येथे राहतो. त्याच्या दोन मुली बाहेरगावी शिकतात. मुलगा नसल्याने त्याने सहा वर्षांपूर्वी एका गरीब कुटुंबाकडून चौदा वर्षांच्या मुलास दत्तक घेतले. त्याचा सांभाळ न करता त्याला घरातील सर्व कामे लावली जातात तसेच अधिकाºयासह त्याच्या कुटुंबीयांकडून लैंगिक शोषण केले आहे. त्याच्या अंगावर असंख्य गरम चटके देऊन जखमा केल्या आहेत. त्याला घरातून बाहेरही जाऊ दिले जात नव्हते. घरात कोंडून त्याचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. आजूबाजूच्या रहिवाशांना या प्रकाराची माहिती समजताच त्यांनी ‘चाईल्ड लाईन’ या संस्थेला कळविले. संस्थेच्या काही स्वयंसेवकांनी त्या मुलाची घरातून सुटका केली. मुलाची अवस्था पाहून त्याला शासकीय संस्थेत ठेवले. या घटनेची माहिती त्या पोलीस उपअधीक्षकास समजताच त्याने सोमवारी दुपारी शासकीय संस्थेत जाऊन मुलाला घरी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने परत घरी जाण्यास नकार दिल्याने संस्थेने पोलीस उपअधीक्षकास विरोध केला.यावेळी संस्थाचालक व पोलीस उपअधीक्षकांच्यात शाब्दिक वादावादी झाली. यावेळी संस्थेने जुना राजवाडा पोलिसांना बोलावून घेतले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तत्काळ संस्थेत आले. यावेळी मात्र पोलीस उपअधीक्षकाने नमती भूमिका घेतल्याने संस्थेच्या सांगण्यावरून पोलीस माघारी गेले; परंतु ‘चाईल्ड लाईन’च्या स्वयंसेवकांनी हे प्रकरण लावून धरल्याने रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या.प्रकरण दडपण्याचा प्रयत्नसंबंधित पोलीस उपअधीक्षकाने हे प्रकरण दडपण्यासाठी शासकीय संस्थेवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चाईल्ड लाईन’च्या स्वयंसेवकाने पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांची भेट घेतली. यावेळी गुजर यांनी त्यांच्याकडून लेखी तक्रारही लिहून घेतली; परंतु त्या स्वयंसेवकालाही धमकाविण्याचा प्रयत्न झाला. पीडित मुलाच्या जीवितास धोका असल्याने त्याला न्याय देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.