कोल्हापूर : १३ वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीशी अश्लिल चाळे केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने बसचालक शशिकांत रामचंद्र चौगुले (वय ५३, रा. हालोंडी, ता. हातकणंगले) याला तीन वर्षे व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी बुधवारी हा आदेश दिला.अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आठवीमध्ये शिकत होती. आरोपी शशिकांत चौगुले हा त्याच शाळेच्या बसवर चालक म्हणून नोकरीस होता. पीडित मुलगी एक मार्च २०१४ रोजी शनिवारी सकाळी शाळा असल्याने बसमध्ये आली. हे पाहून आरोपीने तिला खुणावून घरी बोलविले. ती घरी येताच दरवाजा बंद करून अश्लिल चाळे केले.
शाळा सुटल्यानंतर त्याच बसमधून येत असताना आरोपीने पीडित मुलीला तुझ्या वडिलांचा निरोप सांगायचा आहे, असे सांगून पुन्हा घरी बोलविले. त्याच्या घरासमोर पीडित उभी असताना तो अंगावरील कपडे काढत असल्याचे दिसल्याने ती तेथून घरी गेली. पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्याच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्याविरोधात भा. द. वि. ३५४ व लहान मुलांचा अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
या खटल्यामध्ये सरकारी वकील एस. एस. रोटे यांनी आठ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, फिर्यादी, शाळेतील प्राचार्य यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. तपासाला पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बी. डी. सूर्यवंशी, कॉन्स्टेबल संदीप आबिटकर, ए. एस. माने यांचे सहकार्य लाभले.