कोल्हापूर : कोरोनामुळे गेले आठ महिने मोतीबाग तालमीचा आखाडा बंद होता. मात्र जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी काही अटी व शर्ती घालून परवानगी दिली असून, १९ डिसेंबरपासून पुन्हा शड्डू घुमणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोल्हापूर शहरातील सर्वच आखाडे बंद आहेत. मल्लांना सरावासाठी आखाडा पुन्हा सुरू करण्याची मागणी तालमींकडून होत आहे. याबाबत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी अटी व शर्ती घालून आखाडे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार १९ डिसेंबरपासून मोतीबाग तालमीचा आखाडा सुरू होणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणारे कुस्तीगीर, त्यांचे पालक व तालीम संघाचे व्यवस्थापन यांची मोतीबाग तालीम येथे गुरुवारी (दि. १७) बैठक आयोजित केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने दिली आहे.
कोरोना चाचणी करूनच प्रवेश
मोतीबाग तालमीमध्ये कुस्ती प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना पहिल्यांदा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. निगेटिव्ह असल्याचा दाखला दाखवून कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या कार्यालयातून प्रवेश अर्ज दिला जाणार आहे.
- राजाराम लोंढे