आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : शैक्षणिक आणि शिक्षणपूरक साहित्य देऊन तुम्ही आमचा मदतीचा हात होऊ शकता, अशी मदतीची साद घालत येथील सावली फौंडेशनच्यावतीने गतवर्षीचे वापरलेले शैक्षणिक साहित्य त्याच विद्यार्थ्यांसाठी निरुपयोगी ठरत असल्याने ते साहित्य जमा करण्याचे आवाहन केले आहे. हे शैक्षणिक साहित्य जिल्ह्यातील दुर्गम भागातील निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनचे सचिव अभिजित सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुर्गम भागातील खेड्यापाड्यांतील गरजू विद्यार्थ्यांना मत व्हावी, या उद्देशाने यंदाच्यावर्षीही हा अगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांनी पहिल्या इयत्तेत वापरलेले शैक्षणिक साहित्य, वस्तू पुढच्या इयत्तेत त्यांच्यासाठी बिनउपयोगी ठरत असतात. त्यामुळे असे साहित्य, शैक्षणिकपूरक वस्तू चांगल्या स्थितीत असूनही वापराविना पडून असतात. अशा वह्या, पुस्तकांसह दप्तर, रेनकोट, छत्री, सायकल, खेळाचे साहित्य पडून राहण्यापेक्षाआमच्याकडे जमा करा. त्या वस्तू इतर गरजूंनाही उपयोगी पडू शकतात. त्या वस्तू जमा करण्याचे नवे अनोखे सामाजिक काम सावली फौंडेशनने हाती घेतले आहे.
गतवर्षीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असे जमा झालेले साहित्य स्वच्छता व वर्गीकरण करून शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यांतील निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. यंदाही या दोन तालुक्यांसह आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी याही तालुक्यांतील निवासी आश्रमशाळेत वितरण करण्यात येणार आहे. यासाठी दि. ४ जूनपर्यंत साहित्य जमा करण्याचे आवाहन केले असून, त्यानंतर १५ जूनपासून ते निवासी आश्रमशाळेत वितरण करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस उपक्रम प्रमुख भूषण लाड, उपप्रमुख सूरज डांगे, सल्लागार सागर बकरे, संस्थापक निखिल कोळी, प्रसाद कामते, आदी उपस्थित होते.
फक्त मिस कॉल द्या
यंदाही या उपक्रमासाठी इच्छुकांनी ७५०७१६०३०३ या क्रमांकावर फक्त मिस कॉल द्या, ‘सावली’चे प्रतिनिधी प्रत्यक्ष आपल्या घरी येऊन मदत स्वीकारतील. अगर मदत करणाऱ्यांनी श्री प्रोसेस वर्क्स, दलाल मार्केट, रिलायन्स मॉल मागे, तसेच निखिल पोतदार, नाटेकर शॉप, थोरात हॉस्पिटलजवळ, शहाजी लॉ कॉजेजसमोर, कोल्हापूर येथे देण्याचे आवाहन केले आहे.