अमर पाटील:
कळंबा : एकीकडे झाडे लावण्यासाठी सरकार जनजागृती करत असले तरी दुसरीकडे कळंबा परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी चक्क झाडांवरच कुऱ्हाड चालवून अधिकाऱ्यांनी आपल्याच मोहिमेला हरताळ फासला आहे. रस्त्याच्या कामासाठी या परिसरातील अनेक डेरेदार वृक्षांचा बळी घेत सरकारी धोरणांनी या परिसरातील सावल्या हिरावून घेतल्या आहेत. संभाजीनगर ते कळंबा, संभाजीनगर ते सायबर चौक, आपटेनगर नाका ते क्रशर चौक, क्रशर चौक ते तांबट कमान, फुलेवाडी जकात नाका ते जावळाचा गणपती चौक, असे साठ फुटी रस्ते रुंदीकरण करून विकसित करण्यात आले. तर नगरोत्थान योजनेअंतर्गत साई मंदिर कळंबा ते आपटेनगर चौक, फुलेवाडी रिंगरोड ते आपटेनगर चौक, क्रशर चौक ते शालिनी पॅलेस, तुळजाभवानी कॉलनी ते साळोखेनगर हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल, देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्ते विकसित करण्यात आले. हे रस्ते विकसित करताना रस्त्याकडेच्या महाकाय वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील सावली हरविली आहे. रस्ते विकास होत असताना वृक्षतोडीला विरोध नसला तरी पर्यावरण समतोल राखण्यासाठी नवीन झाडे लावून जगविणे क्रमप्राप्त आहे. मात्र, संबंधित प्रशासनाचे याप्रश्नी अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने उपनगरांतील या भागांत सावल्या गायब झाल्या आहेत. रस्ते विकसित करताना झाडे तोडली तर नवीन झाडे लावून ती संवर्धित करणे निविदाधारक कंपनीस बंधनकारक असते. पण याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने हे रस्ते झाडांविना सुनेसुने झाले आहेत. काही ठिकाणी झाडे लावण्यात आली असली तरी ती जगविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.
चौकट : वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने तापमान वाढीने उपनगरे आज हिट आयलँड बनत आहेत.
उपनगरात अस्ताव्यस्त वाढणाऱ्या नागरिकरणात अपार्टमेंट घरे बांधताना, अंतर्गत रस्ते विकसित करताना बेसुमार वृक्षतोड होत आहे. किमान घनदाट सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपण, संवर्धन व जतन व्हावे ही मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरत आहे.
कोट
: रस्ते विकसित करताना झाडे तोडली खरी पण नव्याने वनसंपदा निर्माण करण्याचा प्रशासनास विसर पडला. रस्त्याकडेस झाडेच दुर्मीळ झाल्याने ऐन उन्हाळ्यात विसाव्यासाठी जागाच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने घनदाट सावली देणारी झाडे लावून संवर्धित करावी.
-पल्लवी सोमनाथ बोळाइकर
फोटो १८ कळंबा वृक्ष : ओळ साळोखेनगर ते देवकर पाणंद मुख्य रस्ताच झाडांविना पोरका दिसत आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सावलीच दुर्मीळ झाली आहे.