कोल्हापूर : महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार आहे. या दलालांपासून देश आणि महाराष्ट्र वाचविला पाहिजे, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी संकलित केलेल्या वह्या शेट्टी यांच्या हस्ते शुक्रवारी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. त्यावेळी शेट्टी यांनी भाजप सरकारचा पंचनामा केला. आमदार पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांच्यासह कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यावेळी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, जून महिना आला की, पालकांना मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पोटात गोळा येतो. या सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असून, अशा परिस्थितीत सतेज पाटील यांनी संकलित केलेल्या पाच लाखांहून अधिक वह्या मुलांसाठी वाळवंटातील ओअॅसिस ठरणार आहेत.
भाजपच्या कारभारावर चौफेर टीका करताना शेट्टी म्हणाले, शाळा बंद करून सध्याच्या सरकारमध्ये असलेल्यांचा चंगळवाद पोसण्यासाठी नवे गुलाम तयार करण्याचे काम सुरू आहे. मीदेखील ‘अच्छे दिन’च्या भूलभुलय्याला भुललो होतो; परंतु ‘सर्व शिक्षा अभियान’ बंद आहे, पेयजल योजना ठप्प आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तर ‘जैसे थे’च आहेत.
दूध दराचे हे संकट येणार, हे मी आधी दोन वर्षे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांना सांगितले होते. क्रूड आॅईलच्या किमती आवाक्यात असताना ५० रुपये वाढीव दराने पेट्रोल विकले जाते. हे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.यांचं धर्मकार्य अन् भोगतोय आम्ही !न्यूझीलंड, डेन्मार्क, आॅस्ट्रेलिया या देशांत भाकड जनावरे कत्तलखान्याला पाठविली जातात. मात्र, भारतात गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने आम्हाला भाकड जनावरे पोसण्याची पाळी आली. सोडून दिलेली अशी हजारो जनावरे उभे पीक उद्ध्वस्त करीत आहेत. यांचे धर्मकार्य होते आणि ते मात्र आम्ही शेतकरी भोगतोय, असे शेट्टी म्हणाले.
मी विंचू चावल्याचे सांगितलेमारुतीच्या मूर्तीच्या बेंबीत एका मुलाने हात घातला तर त्याला विंचू चावला. त्याने इतरांना मात्र आपल्याला गार लागल्याचे सांगितले. इतर मुलेही गार लागले असेच म्हणू लागली; पण मी खरे बोलणारा आहे. मला यांच्या नादाला लागून खरेच विंचू चावला आहे, असे शेट्टी यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.