लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर/बांबवडे : जम्मू-काश्मीर भागातील पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यासोबत लढताना शहीद झालेले जवान सावन बाळकू माने यांच्यावर शनिवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी गोगवे (ता. शाहूवाडी) येथे शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिल्यानंतर त्यांचे सैन्य दलातील बंधू सागर माने यांनी पार्थिवास अग्नी दिला. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला अश्रू अनावर झाले. या वीरपुत्राच्या अंत्ययात्रेस संपूर्ण पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता. सावन माने हे भारतीय सैन्यदलात २८ मार्च २०१३ रोजी मराठा बटालियन, बेळगाव येथे भरती झाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम अहमदाबाद येथे तीन वर्षे कार्यरत होते. त्यांची पाच-सहा महिन्यांपूर्र्वी जम्मू-काश्मीर येथे बदली झाली होती. ते त्या भागातील पूंछ सेक्टरमध्ये सेवा बजावत होते. गुरुवारी (दि. २२) दुपारी माने यांना पाकिस्तानी सैन्यासोबत लढताना वीरमरण आले. शनिवारी सकाळी गोगवे (ता. शाहूवाडी) येथे लष्करी वाहनातून तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. त्यांचे पार्थिव पाहून त्यांच्या आई शोभा, वडील बाळकू, भाऊ सागर माने, बहीण रेश्मा कदम या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. माने यांचे पार्थिव काही वेळ अंत्यदर्शनासाठी घरात ठेवून त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर ठेवण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. पंचक्रोशीतील प्रत्येक चौकात ‘सावन माने अमर रहे...’ ‘वीर जवान, तुझे सलाम’ अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. यावेळी त्यांच्या आठवणींनी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.बांबवडे परिसरात सर्व व्यवहार बंदशहीद सावन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बांबवडेसह पंचक्रोशीतील गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी वर्गानेही संपूर्ण दिवसभर ‘बंद’ ठेवून आपल्या लाडक्या सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली. आणखी एक जवान शहीदश्रीनगर : पांठा चौक बायपास भागात शनिवारी सायंकाळी अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात शनिवारी एक जवान शहीद झाला.
शहीद सावन माने अनंतात विलीन
By admin | Published: June 25, 2017 1:13 AM