कोल्हापूर : नवीन राजवाड्यामध्ये आज, शनिवारी चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने श्री गणरायाचे आगमन झाले. तत्पूर्वी नवीन राजवाड्यावर पालखीतून आणलेल्या या मूर्तीचे खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पूजन केले.नवीन राजवाडा येथील गणपती बाप्पांचे आगमन सकाळी ११:४५ पर्यंत राजवाडा आवारात झाले. तेथून पालखीतून राजवाड्याकडे प्रस्थान झाले. राजवाड्यात विधिवत श्रींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर याज्ञसेनीराजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती आणि यशराजराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.पापाची तिकटी येथून राजवाड्यातील गणेशमूर्तीचे पालखीतून आगमन झाले. घोडेस्वार अग्रभागी होते तर शाही दंड हाती घेतलेल्या मानकऱ्यांचा शाही लवाजमा पालखीसोबत चालत राजवाड्यावर आला. नवीन राजवाड्यावर पालखीतून आणलेल्या या गणेशमूर्तीचे खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती घराण्यातील सर्व मान्यवर आणि मानकरी उपस्थित होते.
Kolhapur: शाही लवाजमा, पालखीतून आला राजवाड्यातील गणराया; खासदार शाहू महाराज यांनी केले पूजन
By संदीप आडनाईक | Published: September 07, 2024 5:41 PM