कोल्हापूर : हिंदकेसरी दीनानाथसिंह यांंना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीचा हात हवा आहे, असे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार व आद्य कर्तव्य म्हणून ‘म्हाडा,’ पुणेचे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे पुढे आले असून, त्यांनी दीनानाथसिंह यांंच्या आयुष्यभराच्या औषधोपचारांची जबाबदारी उचलू, असे आश्वासन देत त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रकमेचा धनादेश आज, सोमवारी रुग्णालयात देऊ, असे रविवारी दीनानाथसिंह यांची भेट घेऊन सांगितले.गेल्या काही महिन्यांपासून हिंदकेसरी दीनानाथसिंह हे डाव्या फुप्फुसात झालेल्या रक्ताच्या दोन गाठी आणि प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीच्या आजाराने त्रस्त आहेत. प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया व गाठीवरील उपचारासाठी त्यांना अर्थिक मदतीची गरज होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत कुस्तीप्रेमींसह अन्य मान्यवर त्यांची भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन देत आहेत. ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी रविवारी त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया व उपचार व्हावेत, अशी सूचना केली. त्यानुसार येत्या ४८ तासांत ‘हिंदकेसरी’ जे डॉक्टर सुचवतील त्यांच्याकडून अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व पुढील उपचार घेतले जातील. त्याकरिता लागणारा खर्च राजे गु्रप व शाहू साखर कारखाना उचलेल. त्यांतील प्रत्येकी ५० हजारांचे दोन धनादेश त्या रुग्णालयात आज, सोमवारी जमा केले जातील, असे आश्वासन घाटगे यांनी दीनानाथसिंह व त्यांच्या कुटुंबीयांना दिले.यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुहास लटोरे, उपमहाराष्ट्र केसरी श्रीपती पाटील, रामा माने, रामदास लोहार, अमर पाटील, ‘हिंदकेसरीं’चे चिरंजीव अभयसिंग, निर्भयसिंग, पत्नी नगीना, आदी उपस्थित होते.दरम्यान, सांगली जिल्हा तालीम संघातर्फे हिंदकेसरी दीनानाथसिंह यांना औषधोपचारांसाठी २५ हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष उत्तमराव पाटील (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक), उपमहाराष्ट्र केसरी संपतराव पाटील (चिंचोली), प्रतापराव शिंदे, राजाराम पोवार, तासगावचे माजी नगराध्यक्ष महादेव बामणे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हणमंतराव जाधव, रवींद्र पाटील, फत्तेसिंह राजमाने, आदी उपस्थित होते.दीनानाथसिंह यांनी ‘हिंदकेसरी’ची गदा मिळाल्यानंतर केवळ राजर्षी शाहू महाराजांवरील प्रेमापोटी अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी या नगरीतून घडविले. कर्मभूमी म्हणून त्यांनी येथेच वास्तव्य केले. त्यामुळे मी राजर्षींच्या एक वारसदार म्हणून माझे आद्य कर्तव्य आणि हक्क म्हणून त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसह संपूर्ण आयुष्यभरातील औषधोपचारांचा खर्च उचलत आहे.- समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष, पुणे म्हाडा व शाहू साखर कारखानाराज्यासह देशभरात अनेक दिग्गज कुस्तीगीर घडविणाऱ्या व कायम लाल मातीचा ध्यास असलेले हिंदकेसरी दीनानाथसिंह आजाराने त्रस्त असल्याचे समजले. त्यामुळे आजारपणात संस्थांनी मदत करणे हे आमचे आद्य कर्तव्य म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून २५ हजारांचा धनादेश दिला.- नामदेवराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद