काँग्रेससह शाहू छत्रपती यांनाही २६ वर्षांनी गुलाल, 'असाही' विलक्षण योगायोग..
By विश्वास पाटील | Published: June 5, 2024 05:21 PM2024-06-05T17:21:13+5:302024-06-05T17:21:51+5:30
कोल्हापूर लोकसभेचे राजकारण : संयम ठेवून सामाजिक काम केल्याचे मिळाले बक्षीस
विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने मंगळवारी काँग्रेस पक्षासह शाहू छत्रपती यांनाही तब्बल २६ वर्षांनी गुलाल लावला. या मतदारसंघातून शाहू छत्रपती यांचे नाव १९९८ च्या निवडणुकीत उमेदवार म्हणून चर्चेत आले होते; परंतु ही संधी मिळण्यासाठी त्यांना तब्बल २६ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. त्यांनी इतकी वर्षे संयम पाळला, असेच काहीसे त्यांच्या बाबतीत अनुभवास आले. सर्वच पक्षांशी उत्तम संबंध आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून त्यांना कोल्हापूरच्या जनतेने लोकशाहीच्या मंदिरात अधिमान्यता दिली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला १९९८ ला शेवटचा विजय मिळाला. ही लढत अत्यंत चुरशीची झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्याबद्दल मतदारसंघात कमालीची नाराजी होती. कारण सलग पाचवेळा ते खासदार होते. राज्यात तेव्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात युतीची हवा होती. त्यावेळी कोल्हापूरचा उमेदवार कोण? याबद्दल चर्चा सुरू होती. त्यामध्ये शिवसेनेकडून शाहू छत्रपती आणि विक्रमसिंह घाटगे यांची नावे पुढे आली होती.
त्याच दरम्यान काही दिवस अगोदर मुख्यमंत्री मनोहर जोशी हे कागलला शाहू कारखान्याच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी घाटगे यांना तुम्ही आता फार काळ बाहेर राहू नका, शिवसेनेची एसटी भरत आली आहे, त्यात लवकर बसा असा सल्ला देऊन लोकसभा उमेदवारीची ऑफर दिली होती. त्यामुळे कोल्हापुरातून शिवसेनेची उमेदवारी कुणाला द्यायची, अशी चर्चा सुरू झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घाटगे यांच्या नावाला प्रथम पसंती दिली. तेव्हा शाहू छत्रपती यांचा सामाजिक वावरही आजच्यासारखा नव्हता. शिवाय घाटगे यांची शाहू कारखाना राज्यात भारी चालवल्याने सहकार क्षेत्रातील स्वच्छ चारित्र्याचा राजकीय नेता अशी प्रतिमा जनमाणसांत चांगलीच रुजली होती. ती कॅश करण्यासाठी त्यांचीच उमेदवारी शिवसेनेने नक्की केली.
घाटगे यांच्यासमोर उदयसिंहराव गायकवाड यांचा निभाव लागणार नाही, हे हेरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वेगळेच फासे टाकले आणि गायकवाड यांना थांबवले व कागलच्या राजकारणातील घाटगे यांचे पारंपरिक विरोधक सदाशिवराव मंडलिक यांना मैदानात उतरविले. ही लढत त्यांनीच जिंकली. शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या निर्णयाचा आदर करून ते घाटगे यांच्या पाठीशी राहिले. त्यानंतर २००९ मध्येही त्यांचे नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत आले होते. तेव्हा संभाजीराजे यांना उमेदवारी मिळाली. शाहू छत्रपती सामाजिक कामात सक्रिय राहिले. टोल आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन अशा विविध आंदोलनांत ते पुढे राहिले. कुठेही राजकीय महत्त्वाकांक्षा न दाखवता समाजबांधणीचे काम त्यांनी केले. त्याचे फळ त्यांना या निवडणुकीत मिळाले.
असाही विलक्षण योगायोग..
लोकसभेला १९९८ ला काँग्रेसचा विजय झाला; परंतु लगेच १९९९ ला काँग्रेस दुभंगली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर १९९९ ला मंडलिक यांनीच ही जागा जिंकली व तेव्हापासून ही जागा राष्ट्रवादीच्याच वाट्याला गेली. ती पुन्हा राष्ट्रवादी दुभंगल्यावरच (२०२३) काँग्रेसच्या वाट्याला आली हा देखील एक विलक्षण योगायोगच म्हटला पाहिजे.